Tue, Apr 23, 2019 19:50होमपेज › Ahamadnagar › संगमनेरात व्यापार्‍याच्या घरावर दरोडा; पितापुत्राला बेदम मारहाण

संगमनेरात व्यापार्‍याच्या घरावर दरोडा; पितापुत्राला बेदम मारहाण

Published On: Jul 22 2018 1:03AM | Last Updated: Jul 22 2018 12:18AMसंगमनेर : प्रतिनिधी

शहरातील नाशिक-पुणे रोडलगत असणार्‍या कुंतूनाथ सोसायटीत राहणार्‍या भरतकुमार मेहता या किराणा व्यापार्‍याच्या बंगल्यात चार ते पाच दरोडेखोरांनी घुसून पिता-पुत्राला मारहाण केली. सोन्याचांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा सुमारे दीड लाखांचा ऐवज लुटल्याची घटना शनिवारी मध्यरात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास घडली.

नाशिक रस्त्यावरील जैन वसाहतीतल्या मेहता यांच्या बंगल्यात भरतकुमार हे पत्नी, मुले, सूना, नातू या कुटुंबासमवेत राहतात. दरम्यान, शनिवारी पहाटे मध्यरात्री चार ते पाच दरोडेखोरांनी भरतकुमार यांच्या बंगल्याच्या मुख्य दरवाजाला लोखंडी ड्रिल मशीनच्या साह्याने होल पाडून बंगल्याची आतून कडी उघडत आत प्रवेश केला. यावेळी आवाज आल्याने भरतकुमार जागे झाले.

त्यांनी  बेडरुमचा दरवाजा उघडताच  दरोडेखोरांनी त्यांना धमकावत मारहाण केली व लहान मुलीचेही तोंड दाबून धमकावले. दरोडेखोरांनी एका दरोडेखोराने भरतकुमार यांच्या गळ्यातील सोन्याच्या दोन्ही चेन ओरबाडल्या तसेच कपाटातील चांदीचे शिक्के व रोख रक्कम काढून घेतली. त्यानंतर त्यांनी शेजारच्या रुममध्ये जावून उचकापाचक सुरू केली. भरतकुमार यांचा मुलगा अतिश व त्याची पत्नी वरच्या मजल्यावरून खाली पळत आले. यावेळी दरोडेखोरांनी पळ काढला. यावेळी झटापट होवून आतिशने एकाला पकडले. मात्र त्याच्या साथीदाराने पुन्हा माघारी येवून अतिशला बेदम मारहाण केली व साथीदाराची सुटका केली. सदरचे दरोडेखोरांची टोळी ही बंगल्याच्या पूर्व दिशेने पळून जाण्यात यशस्वी झाले. 

दरम्यान, चोरट्यांशी झालेल्या झटापटीत भरतकुमार व आतिश हे दोघे जखमी झाले असून त्यातील आतिशवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती समजताच स. पो. नि. शंकरसिंह राजपूत तसेच प्रभारी निरीक्षक अभय परमार, उपनिरीक्षक पंकज निकम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. प्रभारी पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनीही घटनास्थळी जावून भेट दिली.त्यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा तपास सुरू आहे. त्यादृष्टीने सकाळी नाशिकच्या ठसे तज्ज्ञांना   पाचारण केले होते. तसेच श्‍वानपथकानेही तिरंगा चौकापर्यंत माग काढला होता.  

घरफोडीचा लवकरच तपास लावू ः वाकचौरे

मेहता कुटुंबीयांच्या घरी जबरी घरफोडीची घटना घडली आहे. चौघा चोरांनी घरात प्रवेश केल्यानंतर त्यांनी व्यापार्‍याला मारहाण केली व 1 लाख 38 हजाराचा ऐवज पळवला आहे. यामधील एक जण गेटवरून उडी मारत असताना व्यापार्‍याच्या मुलाने पकडला होता. मात्र, त्याच्या साथीदाराने व्यापारी मुलाच्या तोंडावर लोखंडी हत्याराने मारहाण करून पळ काढला. याप्रकरणी मेहता कुटुंबाने चौघांची वेशभूषा सांगितली आहे. पोलिसांकडूनही तपासाला गती दिली आहे. या घरफोडीचा लवकरात लवकर तपास लावला जाईल .         सोमनाथ वाकचौरे ( प्रभारी पोलिस उपअधीक्षक, संगमनेर)