Tue, May 21, 2019 22:09होमपेज › Ahamadnagar › निघोज मळगंगा देवी मंदिरात चोरी

निघोज मळगंगा देवी मंदिरात चोरी

Published On: Sep 02 2018 1:09AM | Last Updated: Sep 02 2018 1:09AMनिघोज : वार्ताहर 

पारनेर तालुक्यातील निघोज येथील जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीच्या मंदिरात शुक्रवारी (दि.31) मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दानपेट्या, सोने-चांदीचे दागिने असा सुमारे 4 लाख 40 हजार रूपयांचा ऐवज लांबविला आहे. मुख्य पेठेत असलेल्या देवी मंदिरापासून हाकेच्या अंतरावर पोलिस दूरक्षेत्र असताना चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

मंदिराचे पुजारी सुनील गायखे हे शनिवारी (दि.1) पहाटे 3.30 ते 4 च्या सुमारास देवीची पूजा करण्यासाठी मंदिरात निघण्याच्या तयारीत होते. मात्र, त्यांच्या घराच्या कड्या बाहेरून लावलेल्या होत्या. त्यामुळे ते खिडकीतून बाहेर आले असता, त्यांना मंदिरात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने जवळच असलेल्या पोलिस दूरक्षेत्रमध्ये जाऊन चोरीची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी मंदिराजवळ येऊन वरिष्ठांना याबाबत माहिती दिली. विशेष म्हणजे मंदिरातून चोरून नेलेल्या दोन्ही दानपेट्या साधारणत: 400 मीटर अंतरावर असलेल्या कपिलेश्वर मंदिराजवळ आढळून आल्या.  या दोन्ही दानपेट्यात साधारण 50 ते 60 हजार रूपये असल्याची माहिती मळगंगा ट्रस्टच्या पदाधिकार्‍यांनी दिली आहे. मंदिरात  सुरक्षेसाठी मळगंगा ट्रस्टने सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले आहेत. मात्र, गेल्या तीन दिवसापासून कॅमेरे बंद असल्याची माहिती ट्रस्टच्या पदाधिकार्‍यांनी दिली. 

मळगंगा मंदिर हे भरबाजारपेठेत असून, तीन लाकडी मजबूत दरवाजे आहेत. एक दरवाजा गाभार्‍याच्या समोर असून, दुसरा मुख्य पेठेकडून तर तिसरा दरवाजा पुजारी गायखे बंधूंच्या घराच्या बाजूने आहे. पुजार्‍याच्या घराच्या बाजूच्या दरवाजातून चोरटे भक्कम कुलूप तोडून मंदिरात आले. त्यावेळी त्यांनी पुजार्‍यांच्या घराला बाहेरून कड्या लावल्या. तीन दानपेट्यांपैकी एक दानपेटी मोठी असल्याने त्यांना ती उचलता आली नाही. मंदिराच्या गाभार्‍याचे कुलूप तोडून त्यांनी अडीच तोळे सोन्याचे व बारा किलो चांदीचे दागिने चोरून नेले. त्यानंतर मंदिरातील दोन दानपेट्या घेऊन ज्या दरवाजातून ते बाहेर आले, तो आतून बंद केला व मुख्य पेठेकडील दरवाजातून बाहेर पडले. या दानपेट्या दशक्रिया विधी घाटाजवळ असणार्‍या मंदिराजवळ नेऊन दगडांनी फोडल्या व आतील रक्कम घेऊन चोरटे पसार झाले.

साधारण पाच ते सहा चोरट्यांनी ही चोरी केली असावी. तसेच दानपेट्या मोठ्या असल्याने त्या चोरट्यांनी वाहनातून चारशे मीटर अंतरावर नेल्या असाव्यात, असा पोलिसांचा अंदाज आहे. दरम्यान, देवी मंदिरातील तब्बल साडेचार लाखांच्या सोनेचांदीच्या दागिन्यांची व दानपेटीतील रकमेची चोरी झाल्याने ग्रामस्थ व भाविकांनी संताप व्यक्त केला. या घटनेचा निषेध म्हणून शनिवारी गाव बंद ठेवण्यात आलेे होते. चोरीची माहिती समजल्यानंतर पहाटेपासून दुपारपर्यंत पोलिस दूरक्षेत्र व मळगंगा मंदिर परिसरात लोकांनी गर्दी केली होती. पोलिस उपअधीक्षक जगताप व पारनेरचे निरीक्षक हनुमंत गाडे यांनी सकाळी 9 वाजता घटनास्थळी भेट देत माहिती घेतली. तसेच स्थानिक पोलिसांना तपासाबाबत सूचना दिल्या. नगर येथून श्वानपथक आणण्यात आले होते. त्याने कपिलेश्वर मंदिरापासून शिरसुले गावापर्यंत माग दाखविला. या चोरीच्या घटनेचा तीव्र निषेध होत असून, तपास न लागल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थ व भाविकांनी दिला आहे.