Tue, Mar 19, 2019 05:12होमपेज › Ahamadnagar › मुख्य लेखाधिकार्‍यांवरही कारवाई!

मुख्य लेखाधिकार्‍यांवरही कारवाई!

Published On: Mar 06 2018 11:03PM | Last Updated: Mar 06 2018 11:02PMनगर : प्रतिनिधी

महापालिकेतील पथदिवे घोटाळ्याप्रकरणी शासनस्तरावर कारवाईत होत असलेल्या विलंबाबाबत शिवसेनेचे आ. विजय औटी यांनी विधानसभेत मांडलेल्या ‘लक्षवेधी’ची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आहे. प्रभारी उपायुक्‍तांवर केलेल्या कारवाईची माहिती देतानांच या प्रकरणात मुख्य लेखाधिकार्‍यांवरही वित्त विभागामार्फत कारवाई करण्यात येत असल्याचे लेखी आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

डिसेंबर महिन्यापासून महापालिकेत पथदिवे घोटाळा गाजत आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ठेकेदार सचिन लोटके, लिपिक भरत काळे सध्या अटकेत आहेत. तर उपशहर अभियंता व विद्युत विभाग प्रमुख रोहिदास सातपुते, पर्यवेक्षक बाळासाहेब सावळे हे दोघे अद्यापही पसार आहेत. या सर्वांसह शहर अभियंता विलास सोनटक्के, प्रभाग अधिकारी नाना गोसावी व जितेंद्र सारसर यांची खातेनिहाय चौकशीही शासनाच्या निवृत्त उपसचिवांमार्फत सुरु झाली आहे. तसेच राज्य शासनानेही याची दखल घेत प्रभारी उपायुक्‍त विक्रम दराडे यांना निलंबित करुन त्यांची विभागीय चौकशी प्रस्तावित केली आहे.

या प्रकरणात शासनाकडून कारवाईत विलंब होत असल्याने आ. औटी यांनी विधानसभेच्या अधिवेशनात लक्षवेधी मांडली होती. शासनाकडून या प्रकरणाची चौकशी करण्यातआली आहे का? यात कोणती कारवाई करण्यात आली? असा सवाल आ. औटी यांनी उपस्थित केला होता. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी लेखी उत्तर दिले आहे. पथदिव्यांच्या कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे मनपाच्या चौकशीत स्पष्ट झाले आहे. यात ठेकेदारासह मनपाचे काही अधिकारी व कर्मचारी दोषी आढळून आले असून 2 अधिकारी व एका कर्मचार्‍याला निलंबित करण्यात आले आहे. त्यांची चौकशी सुरु आहे. प्रकरणाशी संबंधित असलेल्या प्रभारी उपायुक्‍तांना शासनस्तरावरुन निलंबित करण्यात आले आहे. त्यांचीही विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे. महापालिकेच्या मुख्य लेखाधिकार्‍यांविरुद्ध वित्त विभागामार्फत कारवाई करण्यात येत आहे. ठेकेदारास काळ्या यादीत टाकून त्याची नोंदणी रद्द करण्याची कार्यवाही प्रस्तावित करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणातील महापालिकेचे संबंधित अधिकारी, कर्मचारी व ठेकेदाराविरुध्द फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तराद्वारे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, प्रभारी उपायुक्‍त दराडे यांच्यावर निलंबनाची कारवाई यापूर्वीच झालेली आहे. आता मुख्य लेखाधिकार्‍यांवर कारवाई करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांकडूनच स्पष्ट करण्यात आले असल्याने राजपत्रित अधिकार्‍यांमध्ये मात्र चांगलीच खळबळ उडाली आहे. महापालिकेतील घोटाळ्यांबाबत विधीमंडळात मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचे आश्‍वासन दिले जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.