Wed, Aug 21, 2019 02:02होमपेज › Ahamadnagar › तेलीखुंट परिसरामध्ये दोन गटांत उडाली धुमश्‍चक्री

तेलीखुंट परिसरामध्ये दोन गटांत उडाली धुमश्‍चक्री

Published On: Dec 30 2017 12:33AM | Last Updated: Dec 29 2017 10:29PM

बुकमार्क करा
नगर : प्रतिनिधी

तेलीखुंट येथे गुरुवारी (दि. 28) रात्री साडेनऊ वाजता दोन भिन्न धर्मीय गट समोरासमोर भिडले. एकमेकांना मारहाण करून जोरदार दगडफेक करण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांच्यासमोरही दंगेखोरांचा गोंधळ सुरूच होता. विजेच्या सार्वजनिक खांबासह दुकानांचीही तोडफोड करण्यात आली. पोलिसांनी आरोपींची धरपकड करून दोन्ही गटाच्या 21 जणांना अटक केली. त्यांना काल (दि. 29) दुपारी न्यायालयासमोर हजर केले असता, 1 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. 

अटक केलेल्यांमध्ये एका गटाच्या आयाज चाँद शेख, वसीम रहीम शेख, सुफीयान साजिद शेख, जावेद ईस्माईल शेख, वासीम रफीक शेख, आसिफ चाँदसाहब शेख, शोयब शेख मुस्ताक, मन्नार मन्सूर शेख, रिजवान रशीद शेख, मोहसीन मन्सूर शेख, रियाज रशीद शेख, समीर अयाज शेख (सर्व रा. बेलदार गल्ली), कैसर सय्यद अजगर (रा. मुकुंदनगर) व दुसर्‍या गटाच्या दीपक रमेश आडेप, सचिन लक्ष्मण महाजन, ओंकार पांडुरंग भागानगरे, संतोष दत्तात्रय सैंदर, अजिंक्य रमेश म्हस्के, संदीप भास्कर मोकाटे, अनिल देविदास सैंदर, प्रकाश पांडुरंग सैंदर (सर्व रा. नगर) यांचा समावेश आहे. 

गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता अचानक दोन गटांत दंगल उसळली. दगडफेक, आरडाओरड, धावपळ सुरू झाली. घटनेचा सुगावा लागताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिस तेथे पोहोचल्यानंतर त्यांच्यासमोरच गोंधळ सुरू होता. हा दंगा सुरू होताच परिसरातील व्यावसायिकांनी स्वतःच्या दुकानांची शटर खाली ओढले. या घटनेनंतर तोफखाना पोलिस ठाण्याच्या आवारातही मोठी गर्दी झाली होती. त्यात महिलांची संख्या लक्षणीय होती. 
याबाबत एका महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सदर महिलेच्या मुलाला दुपारच्यावेळी अनिकेत सैंदर याने शिवीगाळ केली होती. शिवीगाळ का केली, याची विचारणा करण्यासाठी सदर महिला व तिचा भाऊ तेलीखुंट येथे गेले होते. अनिकेत याला समजावून सांगत असताना त्याने काही टोळक्याच्या मदतीने मारहाण करण्यास सुरुवात केली. महिलेशी लज्जास्पद वर्तन केले. तिच्या गळ्यातील 1 तोळे वजनाचे मंगळसूत्र हिसकावून घेतले. तलवार, लाकडी दांडक्याने दोघांना बेदम मारहाण केली. तसेच परिसरातील महापालिकेचे विद्युत खांबाची तोडफोड करून सार्वजनिक मालमत्तेचेही नुकसान केले. याप्रकरणी 8 जणांना अटक करण्यात आली आहे. गजेंद्र प्रकाश सैंदर, अनिकेत सैंदर व इतर 5-6 जण फरार आहेत.

विरोधी गटाकडून संतोष दत्तात्रय सैंदर (रा. एमजी रोड, तेलीखुंट) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, काही जणांचे टोळके घुसले. हॉटेल चालवायचे असल्यास महिन्याला 5 हजार रुपये हप्ता द्यावा लागेल, असे म्हणून गळ्याला सत्तूर व वस्तरा धरला. खानावळीच्या गल्ल्यातील 5 हजार रुपयांची रोख रक्कम काढून नेली व गळ्यातून 3 तोळे वजनाची सोन्याची चेन हिसकावून घेतली. त्यानंतर हॉटेलच्या बाहेर ओढत नेऊन लाकडी दांडके, लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच सैंदर यांना सोडविण्यासाठी आलेले स्वास्तिक मेडिकल दुकानाचे मालक हिराकांत रामदासी, स्मिता मेडिकलचे चंद्रकांत लोखंडे, दिनेश तेली आदींना मारहाण केली. तसेच सार्वजनिक लाईट खांबावर दगडफेक करून लाईट तोडली. काचेच्या बाटल्या फेकून मारल्या. याप्रकरणी 13 जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच सलमान शेख, अश्पाक शेख, मोहसीन खान, अदील खान आदींविरुद्ध दरोडा, सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संजयकुमार सोने, विशाल सणस हे करीत आहेत.