Sat, Apr 20, 2019 08:45होमपेज › Ahamadnagar › अल्पवयीन मुलीवर महिनाभर अत्याचार

अल्पवयीन मुलीवर महिनाभर अत्याचार

Published On: Jul 01 2018 1:51AM | Last Updated: Jun 30 2018 10:42PMपारनेर : प्रतिनिधी

अल्पवयीन मागासवर्गीय मुलीस डांबून ठेऊन तिच्यावर तब्बल महिनाभर दोघा नराधमांनी सामूहिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना तालुक्यातील वडगाव आमली येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून दोघाही नराधमांना पोलिसांनी अटक केली आहे. 

रोशन सुरेश पवार (वय 20, रा. वडगांव आमली, ता. पारनेर) व सचिन विठ्ठल रोहोकले (वय 25, रा. माळवाडी, भाळवणी ता. पारनेर) ही अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दि. 27 मे रोजी पीडित मुलगी गावातीलच तिच्या आजोबांसोबत मळ्यात जनावरे सांभाळत होती. दुपारी 4.30 वाजता तिच्या मोबाईलवर रोशन सुरेश पवार याने फोन करून मला तुला भेटायचे आहे, असे सांगून तिला शेताजवळील अमोल सुदाम पवार यांच्या बंद  घराजवळ बोलविले. पीडित मुलगी आजोबांना काहीही न सांगता रोशनने सांगितल्याप्रमाणे ती त्या बंद घराजवळ गेली. तेथे रोशन यास भेटल्यावर तू आता कोठेही जायचे नाही, असे सांगून पीडितेस त्याने बंद घरात नेले. तेथे पीडितेकडील मोबाईल ताब्यात घेऊन आरडा ओरडा केलास किंवा पळ काढण्याचा प्रयत्न केल्यास ठार मारील, अशी धमकीही दिली. पीडितेस घरात कोंडून बाहेरून कुलूप लावून रोशन तेथून निघून गेला. त्या रात्री तो परत आला नाही. त्यानंतर दररोज रात्री 10 नंतर तो पीडितेस खाण्यासाठी वडापाव, सामोसे, पिण्याचे पाणी घेऊन येत असे व तेथेच मुक्‍काम करीत असे. मुक्‍कामादरम्यान रोशन पीडितेच्या इच्छेविरूद्ध अत्याचार करीत असे. 

काही दिवसानंतर रोशन याने सचिनला पीडितेकडे नेले. त्याने सचिनची मावसभाऊ म्हणून ओळख करून दिली. त्यांनी सोबत आणलेले अन्न पदार्थ पीडितेने खाल्ल्यानंतर ते तेथून निघून गेले. दुसर्‍या दिवशी एकटा सचिन रोहोकले वडापाव, समोसे तसेच पाण्याच्या बाटल्या घेऊन आला. रोशन का आला नाही, अशी विचारणा करून पीडितेने त्यास फोन लावून देण्यास सांगितले. रोशनशी संपर्क केल्यानंतर तुझ्या घरचे माझ्या घरी येऊन गेल्यामुळे माझ्या घरचे लोक मला बाहेर येऊ देत नाहीत, अशी बतावणी रोशनने केली. त्यानंतर दोघेही आलटून पालटून बंद खोलीत येत व खाद्यपदार्थ देऊन निघून जात. 15 ते 20 दिवसात रोशन पवार याने पीडितेवर चार वेळा अत्याचार केला. बहिणीचे लग्‍न असल्याने यापुढे मावसभाऊ सचिन जेवण व पाणी घेऊन येईल, असे पीडितेस रोशनने सांगितले. पुढील आठ ते नऊ दिवस सचिन रोहोकले जेवण व पाणी घेऊन जात असे. दोघांच्या भेटीदरम्यान सचिन रोहोकले यानेही पीडितेवर तिनदा अत्याचार केला.

दि. 25 जून रोजी रात्री 9.30 वा. सचिन अन्नपदार्थ घेऊन गेला. ते खाल्ल्यानंतर रोशन कधी येणार आहे, मला इथे रहायचे नाही, असे पीडितेने सांगितल्यानंतर यापुढे रोशन येथे येणार नाही, तो तुला भेटणार नाही, त्याचा नाद सोडून दे, मी तुला तुझ्या घराजवळ सोडतो, असे सचिन म्हणाला. त्यानंतर सचिनने पुन्हा पीडितेवर अत्याचार करून जे घडले ते कोणासही सांगून नकोस, नाहीतर तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली. दि. 26 जून रोजी रात्री 12.30 च्या सुमारास सचिनने पीडितेस तिच्या आजोबांच्या घराजवळ नेऊन सोडले. तो तेथून दुचाकीवरून निघून गेला. दार वाजवूनही आजोबांनी ते न उघडल्याने पीडित मुलगी घराबाहेरील ओट्यावर बसून राहिली. पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास आजोबा लघुशंकेसाठी घराबाहेर आले असता पीडिता त्यांच्याजवळ धाऊन गेली. आजोबांनी तिला इतके दिवस कोठे होती, याची विचारणा केली असता तिने काहीच उत्‍तर दिले नाही. आजोबांच्या घरी झोपल्यानंतर सकाळी साडेनऊ वाजता तिचे आई वडील आजोबांच्या घरी आले. तेव्हा पीडितेने झालेला प्रकार कथन केला. त्यानंतर पीडितेची आई, वडीलांनी तिला पारनेर पोलिस ठाण्यात नेले. तिने दिलेल्या जबाबानुसार दोघा नराधमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, पीडितेचे अज्ञात व्यक्‍तीने अपहरण केल्याची फिर्याद तिच्या कुटुंबियांनी पोलिस ठाण्यात यापूर्वीच दाखल केली होती.