नगर : प्रतिनिधी
शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांमध्ये वर्ग 1 व वर्ग 2 मध्ये चुकीची माहिती भरणार्या शिक्षकांच्या माहितीची तपासणी गटशिक्षणाधिकार्यांमार्फत सुरु करण्यात आली आहे. मात्र पंचायत समिती स्तरावर ‘मनाजोग्या’ अहवालासाठी गटशिक्षणाधिकार्यांवर दबाव वाढू लागल्याने या अहवालाचे क्रॉस व्हेरिफिकेशन करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली आहे. यामुळे चुकीची माहिती भरलेल्या शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत.
गटशिक्षणाधिकार्यांनी तपासणी सुरु केल्यावर पंचायत समितीतील पदाधिकार्यांमार्फत तसेच शिक्षक नेत्यांमार्फत मोठ्या प्रमाणावर ‘दबावतंत्राचा’ अवलंब सुरु झाला आहे. त्यातून ‘मनाप्रमाणे’ अहवाल देण्यासाठी ‘अर्थकारण’ होत असल्याची चर्चा शिक्षण वर्तुळात जोरात आहे. त्यामुळे गटशिक्षणाधिकार्यांनी दबावातून दिलेला अहवाल खरा कसा मानणार? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. त्यामुळेच दुसर्या तालुक्यातील गटशिक्षणाधिकार्यांमार्फत अहवाल पुन्हा तपासण्यात येणार आहे.
बदल्यांच्या प्रक्रियेत विस्थापित झालेल्या शिक्षकांनी खोटी माहिती भरून बदली झालेल्या 100 शिक्षकांची यादीच शिक्षणाधिकार्यांकडे देत चौकशीची मागणी केली होती. तसेच एका संघटनेने संपूर्ण बदल्यांची प्रक्रियाच संशयास्पद असल्याचे सांगत संपूर्ण प्रक्रियेची चौकशी करण्याचीही मागणी केली होती. या बदल्यांमध्ये जिल्ह्यातील 620 शिक्षक विस्थापित झाले असून, हे शिक्षक दिवसेंदिवस आक्रमक होत आहेत. अनेकांनी न्यायालयात जाण्याचीही तयारी सुरु केली आहे.एखाद्या शिक्षकाने चुकीची माहिती भरलेली असल्यास संबंधित शिक्षकाची ऑनलाईन बदली ‘एनआयसी’च्या माध्यमातून रद्द करण्यात येणार आहे. त्या शिक्षकाच्या रिक्त झालेल्या जागेवर विस्थापित शिक्षकांना नेमणूक देण्यात येईल. सर्व जागा भरल्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर या चुकीची माहिती देणार्या शिक्षकांना टाकण्यात येईल. तसेच या शिक्षकांना पुढील पाच वर्षे बदलीसाठी अर्ज करता येणार नाही.