Sat, Jul 20, 2019 02:45होमपेज › Ahamadnagar › शिक्षक नेते फिरणार दारोदारी!

शिक्षक नेते फिरणार दारोदारी!

Published On: Jul 01 2018 1:51AM | Last Updated: Jun 30 2018 10:39PMनगर : प्रतिनिधी

शिक्षकांना निवडणुकीची कामे देऊ नयेत यासाठी जिल्हा निवडणूक विभागाकडे अनेक शिक्षक नेत्यांनी निवेदने दिली. या नेत्यांना ‘बीएलओ’चे काम नसतांनाही इतरांसाठी पुढाकार घेतलेल्या शिक्षक नेत्यांना आता दारोदारी फिरण्याची वेळ येणार आहे. अशा शिक्षक नेत्यांना निवडणूक विभागाने ‘बीएलओ’चे काम दिले आहे. नेत्यांच्या ‘चमकोगिरी’ला प्रशासनाने उत्तर दिल्याने शिक्षक नेते मात्र चांगलेच अस्वस्थ झाले आहेत.

निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार शिक्षकांना निवडणुकीशी संबंधित कामे करण्याचे बंधन आहे. याविरोधात पूर्वी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र न्यायालयानेही हे काम शिक्षकांना करावेच लागेल असा निकाल दिलेला आहे. परंतु दरवर्षी विविध कारणे सांगत काही शिक्षक नेते व संघटनांकडून निवडणुकीच्या कामाला विरोध करण्यात येतो.

निवडणूक विभागातर्फे दरवर्षी याबाबत शिक्षकांना सूचना देऊन काम करण्यास सांगण्यात येते. मात्र शिक्षक नेत्यांच्या आडून काही शिक्षक हे काम टाळण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतात. त्यासाठी ‘बीएलओ’चे काम केल्यास शैक्षणिक गुणवत्ता ढासळेल. विद्यार्थी व शिक्षकांचे नुकसान होईल असे विविध कारणे देण्यात येतात. कामात हलगर्जीपणा केल्यास संबंधित शिक्षकाला निवडणूक विभागातर्फे नोटीस पाठविण्यात येते.

नोटीस मिळाल्यावर त्याचा योग्य खुलासा न केल्यास संबंधित शिक्षकावर प्रशासकीय कारवाई करण्यात येते. जिल्ह्यात गेल्या तीन वर्षात अशा प्रकारे अनेक शिक्षकांवर कारवाई करण्यात आलेली आहे. शिक्षकांनी निवडणुकीचे काम नाकारण्यामागे शिक्षक नेत्यांनी त्यांना लावलेली फूस कारणीभूत असल्याचे निदर्शनास आले आहे. अनेक शिक्षकांनी खुलासे देतांना तसा उल्लेख केल्याचे समजते.
त्यामुळे या सगळ्याला जबाबदार असलेल्या शिक्षक नेत्यांच्याच गळ्यात ‘बीएलओ’ची कामे देण्याची नामी शक्कल निवडणूक विभागाने काढली आहे. त्यानुसार सर्व प्रमुख शिक्षक संघटना, वित्तीय संस्थांच्या प्रमुख पदाधिकार्‍यांना बीएलओचे काम देण्यात आले आहे. ‘पुढारक्या’ करण्याची सवय लागलेल्या या शिक्षक नेत्यांना आता ‘बीएलओ’चे काम करावे लागणार आहे. हे नेते स्वतः दारोदारी जाऊन ‘बीएलओ’चे काम करतात की नाही याचीही तपासणी निवडणूक विभागातर्फे केली जाणार आहे.