टाकळी ढोकेश्वर: वार्ताहर
नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर प्रस्तावित असणार्या तिखोल फाटा टोलनाक्याजवळच बुधवारी रात्री 9.15 वाजण्याच्या सुमारास मालट्रक व पिकअपची समोरासमोर धडक होवून तिखोलचा तरुण ठार झाला आहे. अकुंश भागाजी ठाणगे (वय 28 रा. तिखोल, काळूनगर, ता.पारनेर)असे असून त्याला उपचारासाठी नगरला नेत असताना उपचारापूर्वी त्याची प्राणज्योत मालविली.
या अपघातातील मालट्रक (एमएच.बीजे 1176) ही नगरकडून कल्याणच्या दिशेने तर पिकअप (एमएच.16 ए वाय 3090) ही तिखोल गावाकडे चालली होती. तिखोल फाट्यावर असणारा वळणावर हा समारोसमोर अपघात झाला. या अपघातासंबंधी कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल व फिर्याद नसल्याने पोलिसांनी ही दोन्ही वाहने काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी तातडीने यासबंधीचा गुन्हा दाखल करावा मगच वाहने काढावी अशी मागणी लावून धरत गुरूवारी सकाळी 9 वाजता तिखोल येथे अचानक रस्ता रोको केला. तसेच अॅम्बुलन्समध्ये आणलेला मृतदेह तसाच गाडीमध्ये ठेवून रस्ता रोको केला. या तरुणावर अंत्यसंस्कार न करण्याचा पवित्रा नातेवाईक व ग्रामस्थांनी घेतला. त्यामुळे या महामार्गावर 1 किलोमीटर पर्यंत वाहनाच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. त्यानंतर पारनेरचे पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे व पोलिस हवालदारआबा ढोले हे घटनास्थळी दाखल होऊन तातडीने यासबंधी गुन्हा नोंदविण्यात येऊन याची प्रत मृताच्या नातेवाईकांच्या हातात लगेच दिली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर हा रास्ता रोको मागे घेण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी या महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. हा मालट्रक व पिकअप अपघात इतका प्रचंड होता की, या अपघातात पिकअपचा चक्काचूर झाला आहे. या महामार्गावर काम चालू असल्याने रस्ता अरूंद बनला आहे. त्यामुळे या महामार्गावर अपघातांचे प्रमाणात मोठी वाढ झाली आहे.
तब्बल दोन तासानंतर चालकाला बाहेर काढले
अपघातग्रस्त पिकअप चेंडूसारखी गोल झाल्याने चालकाला पिकअपमधून बाहेर काढण्यासाठी तब्बल दोन तासानंतर यश आले. मात्र, बराच कालावधी गेल्याने जखमीची रुग्णालयात पोहचेपर्यंतच प्राणज्योत मालविली.