Wed, Jan 16, 2019 12:15होमपेज › Ahamadnagar › हिमोफिलिया रुग्णांची हेळसांड...!

हिमोफिलिया रुग्णांची हेळसांड...!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

टाकळी ढोकेश्‍वर : वार्ताहर

हिमोफिलिया रुग्णांसाठी जीवनावश्यक असलेली औषधे तब्बल तीन वर्षांनंतरही खरेदी करण्यात आलेली नाहीत. ही खरेदी सध्या टेंडर प्रक्रियेत अडकविण्याचा केवीलवाणा प्रकार शासनाच्या आरोग्य विभागात घडत असल्याने रुग्णांचे औषधाविना हाल होत आहेत.

राज्यात हिमोफिलिया रुग्णांसाठी जुने सहा व नविन दोन, असे आठ डे-केअर सेंटर आहेत. त्या माध्यमातून या रुग्णांना जीवनावश्यक असणारी औषधे मोफत दिली जातात. मात्र गेल्या तीन वर्षांपासून शासनाचे टेंडर व रिटेंडरच्या टक्केवारीच्या प्रक्रियेत ही औषध खरेदी अडकली आहेत. त्यामुळे हे रुग्ण अत्यवस्थ असून, अनेक रुग्ण दगावले आहेत, तर असंख्य रुग्णांवर कायमचे अपंगत्व ओढावले आहे.
नगर जिल्हयात हिमोफिलियाचे जवळपास 400 रुग्ण असून, या रुग्णांना रक्तघटकाची कमतरता असते. या घटकाच्या एका युनिटची किंमत 12 ते 15 रुपये म्हणजे प्रत्येक रुग्णाला एकावेळी 25 ते 55 हजार रुपये मोजावे लागत आहेत. हा खर्च सर्वसामान्यांना परवडणारा नसल्याने उपचारा अभावी अनेक रुग्ण दगावत आहेत. त्यामुळे शासनाने रुग्णांना ही औषधे उपलब्ध व्हावित, यासाठी नगर, नाशिक, मुंबई, नागपूर, अमरावती, ठाणे, पुणे व सातारा जिल्हा रुग्णालयांत आठ डे-केअर सेंटर कार्यान्वित करून मोफत उपचाराची सोय केली आहे. मात्र तीन वर्षांपासून हिमोफिलिया बाबत शासनाची उदासीनता दिसून येत असून, तब्बल 14 ते 15 वेळा औषधांची रिटेंडरिंग केली आहे. ती कशासाठी? हे आज तागायत कुणालाही कळले नाही.