Sat, Aug 24, 2019 22:20होमपेज › Ahamadnagar › नगर-पुणे महामार्गावरील अतिक्रमणांवर हातोडा

नगर-पुणे महामार्गावरील अतिक्रमणांवर हातोडा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सुपा : वार्ताहर

नगर-पुणे महामार्गावर सुपे येथे असलेल्या अतिक्रमणांवर सार्वजनिक बांधकाम विभागाने हतोडा चालवला. त्यामुळे आता हा रस्ता मोकळा श्‍वास घेऊ लागला आहे. मागील अनेक दिवसांपासून ही अतिक्रमणे हटविण्याची मागणी होत होती. काल पोलिस बंदोबस्तात ही अतिक्रमणे काढण्यात आली.

नगर-पुणे रस्त्यावर सुप्यात व्यावसायिकांनी रस्त्याच्या कडेला मोठ्याप्रमाणात अतिक्रमणे केली होती. त्यामुळे वारंवार वाहतुकीची कोंडी होत होती. त्यामुळे वाहनचालकांतून ही अतिक्रमणे काढण्यात यावीत, अशी मागणी होत होती. मात्र त्यास मुहूर्त लागत नव्हता. मात्र काल (दि.28) सार्वजनिक बांधकाम विभागाने या अतिक्रमणांवर हतोडा उगारला. काल सकाळी अकरा वाजता सुपा चौकातून अतिक्रमण काढण्यास प्रारंभ झाला. झोपडी कँटीन हॉटलचे शेड जमीनदोस्त करण्यात आले. त्यानंतर काही अतिक्रमणधारकांनी स्वतःच पुढाकार घेत आपली अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली. नगर ग्रामीण पोलिसांच्या टास्कफोर्स सह सुपा व पारनेर पोलिस ठाण्यातील कर्मचारी बंदोबस्तासाठी यावेळी तैनात करण्यात आले होते.  

सुपा चौकानंतर बंद पडला बीयर बार, दलित सुधार योजनेतील जुना सभामंडप, झोपडपट्टीचा काही भाग काढण्यात आला. बाळू जाधव याने घराची भिंत पाडण्यास विरोध केला. यावेळी पोलिसांनी त्यास घराच्या बाहेर काढल्यानंतर ही भिंत पाडण्यात आली. सुप्याचे उपसरपंच राजू शेख यांच्या हॉटेलचा काही भाग पाडण्यात आला. अपना बेकरी हॉटेलचाही काही भाग पाडण्यात आला.  योगेश रोकडे यांच्या तीन मजली इमारतीचा कोपरा पाडण्यात आला. प्रशासनाने अंतर मोजून अतिक्रमणे काढली.  रस्त्यावरील ही पक्की अतिक्रमणे काढल्यामुळे रस्ता आता मोकळा स्वास घेऊ लागला आहे. अतिक्रमणे काढताना महामार्गावर अनेकवेळा वाहतुकीची कोंडी होत होती. पोलिस वाहनचालकांना वाट काढून देत होते. महामार्गावर काही गुंडांनी शासनाच्या जागांवर अतिक्रमणे करून या जागा भाड्याने दिल्या होत्या. त्यामुळे या परिसरात कायमच वादाचे प्रसंग घडत होते. मात्र आता ही अतिक्रमणे काढल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍नही सुटणार आहे. 

प्रशासनाने अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावल्यानंतर काही अतिक्रमणधारकांनी पुढार्‍यांचे उंबरे झिजविले. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. यावेळी बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी श्रीरंग देवकुळे, स्थापत्य अभियंता विश्‍वनाथ दिवटे, अप्पर पोलिस अधीक्षक मनीष कनलीयार, दत्तात्रय बाहुले, सुपा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील व पोलिस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

कुणावरही अन्याय होणार
नाही:  देवकुळे

अतिक्रमणे काढताना आम्ही कुणावरही अन्याय होऊ देणार नाही. कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही. अतिक्रमणे काढण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. अतिक्रमणे काढल्यानंतर पुन्हा जे अतिक्रमणे करतील, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी श्रीरंग देवकुळे यांनी दिला.