होमपेज › Ahamadnagar › सुजय विखे यांना आ. कर्डिले यांच्याकडून भाजपाचे निमंत्रण!

सुजय विखे यांना आ. कर्डिले यांच्याकडून भाजपाचे निमंत्रण!

Published On: Dec 10 2017 1:17AM | Last Updated: Dec 09 2017 11:38PM

बुकमार्क करा

राहुरी : प्रतिनिधी

भाजपचे आ. शिवाजीराव कर्डिले यांनी डॉ. सुजय विखे यांना भाजपमध्ये प्रवेश करून खासदार होण्याचा ‘राजकीय’ सल्ला दिला. त्यास हजरजबाबी असलेले राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी त्यांना, आज सत्ता तुमची आहे. उद्या आमची येईल, त्याउलट तुम्हीच खा. नाना पटोले यांचा आदर्श घेत, शेतकर्‍यांना न्याय म्हणून आमदारकीचा राजीनामा द्यावा, असे प्रत्युत्तर दिलेे. यावेळी रंगलेल्या या राजकीय जुगलबंदीमुळे उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला.

तनपुरे कारखाना गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमावेळी आ. कर्डिले यांनी भाषणाला प्रांरभ करताच आपल्या अनोख्या शैलीत डॉ. सुजय विखे यांच्यात  व आपल्यात आगामी दोन्ही निवडणुकांबाबत सेटलमेंट झालेली आहे. विखे यांच्याकडे पत्त्याच्या खेळातील जोकर आहे. सत्तेत असो किंवा विरोधात, विखे हे जोकर पत्त्याचा वापर करून आपली कामे करून घेण्यात पटाईत आहेत. काँगे्रसचा गुजरात निवडणुकीत भ्रमनिरास होणार असून, त्या निवडणुकीपर्यंतच भाजपमध्ये भरती केली जाणार आहे. जोपर्यंत गुजरात निवडणूक सुरू आहे, तोपर्यंत उंची, वजन व इतर कोणतीही पार्श्‍वभूमी न पाहता कोणालाही भाजपामध्ये काम करण्याची संधी दिली जाणार आहे. परंतु, गुजरात निवडणूक संपताच भाजपाची भरती थांबविली जाणार आहे. यामुळे विखे यांना चांगली संधी असून, खासदारकीची निवडणूक लढविण्यासाठी डॉ. सुजय विखे यांनी गुजरात निवडणुकीपूर्वी भाजपात यावे, असे म्हणताच उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला. 

त्यानंतर आ. कर्डिले यांच्या भाषणाचा धागा पकडून,  विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे म्हणाले की, राज्य शासनाच्या विरोधात तीव्र नाराजी आहे. यामुळे सत्तापालट होणार असून, शेतकर्‍यांच्या व्यथा पाहता आ. कर्डिले यांनी सत्ताधारी भाजपचे खा. नाना पटोले यांचा आदर्श घ्यावा. आम्हाला भाजपाचे आमंत्रण देण्यापेक्षा आ. कर्डिले यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्यास, त्यांचे ‘राजकीय’ वजन वाढल्याशिवाय राहणार नाही, असे सांगताच उपस्थितांनी त्यास चांगलीच दाद दिली. यावेळी विखे म्हणाले की, काहींना आमची विरोधकांशी असलेली मैत्री पाहून पोटात गोळा येतो. मात्र, सत्ताधारी लोकांशी मैत्री करून समाजाचा विकास साधण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न आहे. तशीच मैत्री आ. कर्डिले यांच्याशीही असून, त्यांच्यामध्ये विकासकामे करण्याची धमक आहे. ते कोठेही असले, तरी त्यांना आपली साथ कायम राहील. डॉ. सुजय विखे व आ. शिवाजीराव कर्डिले यांनी अशाच पद्धतीने एकत्र काम करून समाजाचा विकास करावा, असेही विखे  म्हणाले. विखे व कर्डिले यांच्या रंगलेल्या जुगलबंदीची उपस्थितांमध्ये चांगलीच चर्चा रंगली होती.