Sun, Jul 21, 2019 10:46होमपेज › Ahamadnagar › अहो, कुणी ऊस नेता का ऊस !

अहो, कुणी ऊस नेता का ऊस !

Published On: Dec 29 2017 1:35AM | Last Updated: Dec 29 2017 12:39AM

बुकमार्क करा
राहुरी : प्रतिनिधी 

तालुक्यात यंदाच्या गळीत हंगामासाठी सर्वाधिक ऊस क्षेत्र असताना तब्बल 12 कारखान्यांच्या टोळ्या ऊसतोडणीसाठी दाखल झाल्या होत्या. आडसाली ऊस पळविल्यानंतर बहुतेक कारखान्यांनी आपापल्या गटात टोळ्या परत नेल्या आहेत. तसेच स्थानिक दोन्ही कारखान्यांची मजूर क्षमता अपुरी पडत असल्याने ऊस उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. 

राहुरी भागात तब्बल 11 हजार हेक्टर ऊस क्षेत्राची नोंद करून शेतकर्‍यांनी ऊस आगाराची प्रचिती दिली होती. त्यानुसार तब्बल 12 कारखान्यांनी राहुरीच्या फडात दाखल होऊन ऊस तोडणीला प्रारंभ केला होता. डॉ. तनपुरे कारखाना सुरू होण्यापूर्वी इतर कारखान्यांच्या सुमारे 500 टोळ्या राहुरी, बारागाव नांदूर, टाकळीमिया, ब्राम्हणी, वांबोरी, आरडगाव, मानोरी, देवळाली प्रवरा, कोल्हार खुर्द, सात्रळ परिसरात सज्ज झाल्या होत्या.

दरम्यान, बहुतेक कारखान्यांनी आडसाली उसाला महत्व देत प्रारंभी राहुरीत मोठ्या प्रमाणात ऊस पळविला. मात्र यंदा उत्पादनात वाढ होत असल्याने तसेच आडसाली ऊस बर्‍यापैकी गाळप केल्यानंतर बाहेरच्या कारखान्यांनी आपल्या गटात दाखल होण्यासाठी परतीचा मार्ग पकडला आहे. परिणामी, सद्यस्थितीला तनपुरे कारखाना, प्रसाद शुगर कारखाना, प्रवरा कारखाना, थोरात कारखाना वगळता इतर कारखान्यांच्या अत्यल्प टोळ्या राहुरीत आहेत. 

राहुरीत डॉ. तनपुरे कारखाना तब्बल तीन वर्षानंतर प्रारंभ झाल्याने अधूनमधून मशिनरीच्या समस्या निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे.मात्र तरीही कमी-जास्त प्रमाणात कारखान्याचे गाळप सुरूच आहे. दररोज शेकडो वाहनांमधून कारखान्याला ऊस गाळपासाठी आणला जात आहे. तर प्रसाद शुगर कारखान्याकडेही ऊस उत्पादकांची मोठी रिघ लागलेली असून प्रसाद शुगरचे दैनंदिन 3 हजार ते 3200 मे.टन प्रतिदिन गाळप सुरू आहे. कारखान्याने एकूण 1 लाख 35 हजार मे.टन ऊस गाळप केल्याची माहिती कारखाना प्रशासनाकडून मिळाली आहे. 

अशाप्रकारे राहुरीत सध्या तनपुरे सहकारी कारखान्याबरोबरच खासगी प्रसाद शुगर पूर्ण क्षमतेने शेतकर्‍यांचा ऊस तोडणी करताना दिसत आहे. तनपुरे कारखान्याला ऊस पुरवठा करण्यासाठी प्रवरा कारखान्याच्या टोळ्या राहुरीत ऊस तोडणी करत असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक भाऊसाहेब सरोदे यांनी दिली. तर राहुरीत दाखल झालेल्या 10 ते 12 कारखान्यांनी आपल्या राहुरीतील टोळ्या काढून घेतल्याने राहुरी परिसरातील शेतकर्‍यांना ऊस गाळपाला पोहोच करण्यासाठी मोठी धडपड करावी लागत आहे. प्रसाद शुगर कारखाना व तनपुरे कारखान्याचे गाळप सुरू असतानाही राहुरीतील ऊस उत्पादकांना ऊस देण्यासाठी मोठी धडपड करावी लागत असल्याचे पाहता बाहेरील कारखान्यांकडून केवळ चांगल्या प्रतिचा ऊस मिळावा म्हणून प्रयत्न दिसून येत आहे. बाहेरील कारखान्यांनी टोळ्या नेल्याने राहुरीतील ऊस उत्पादकांना तनपुरे व प्रसाद कारखान्याशिवाय हक्काचा पर्याय नसल्याचे दिसत आहे. 

‘ त्या’ अधिकार्‍याची ‘पटेलगिरी’!

शेतकर्‍यांना आडसाली ऊस तोडण्यासाठी अनंत अडचणी येत आहेत. एका कारखान्याच्या ‘त्या’ अधिकार्‍याकडे शेतकरी वारंवार पाठपुरावा करत असतानाही संबधीत ‘टपेल’ अधिकारी शेतकर्‍यांना चिरीमिरीसाठी वेठीस धरत आहे. तसेच अन्य कारखान्यांसाठीही ऊस उत्त्पादकांना दोन हजार ते पाच हजार रुपये मोजावे लागत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. त्यामुळे कारखाना व्यवस्थापनाने याप्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी शेतकरी करताना दिसत आहे.