Thu, Jul 18, 2019 00:04होमपेज › Ahamadnagar › साखर घसरणीमागे कारखानदार, व्यापारी

साखर घसरणीमागे कारखानदार, व्यापारी

Published On: Feb 06 2018 1:43AM | Last Updated: Feb 06 2018 1:09AMशिर्डी : प्रतिनिधी

राज्यातील काही कारखान्यांनी साखर उद्योगातील व्यापार्‍यांशी संगनमत करून, बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात साखर उपलब्ध केल्याने साखरेचे भाव घसरले आहेत. या कारखान्यांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले.

शिर्डीत सोमवारी साई दर्शनासाठी आले असता शासकीय विश्रामगृह येथे ते पत्रकारांशी बोलत होते. याप्रसंगी श्रीरामपूर पंचायत समितीचे सभापती दीपकराव पटारे, डॉ. राजेंद्र पिपाडा, शिवनाथ जाधव, विष्णुपंत खंडागळे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

ना. खोत म्हणाले, की बाजारपेठेत साखरेचे भाव घसरल्याने त्यामध्ये राज्य सरकार निश्‍चितच लक्ष घालणार आहे. साखर कारखान्यांना केंद्र व राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे.

 2015-16 मध्ये साखर कारखाने अडचणीत आले होते. त्यावेळी शेतकर्‍यांना एफआरपी देण्यासाठी मोठ्या प्रमाणात पॅकेज देण्यात आले होते. तसेच ऊस खरेदी कर राज्य सरकारने गेल्यावेळी अर्थसंकल्पात 100 टक्के माफ केलेला आहे. शेतकर्‍यांना एफआरपी देता यावी, हा त्या मागचा उद्देश होता. सध्याची परिस्थिती पहाता 260 लाख मेट्रिक टन साखर उत्पादन आहे. त्यामुळे जेवढी गरज आहे, तेवढे उत्पादन आहे. अचानकपणे बाजारपेठेत जादा साखर उपलब्ध करण्यामागे मोठा घोटाळा आहे. एकीकडे शेतकर्‍यांना एफआरपी मिळू नये, तर दुसरीकडे व्यापार्‍यांना कमी भावात मोठ्या प्रमाणात साखर खरेदी करून साठेबाजी करता यावी. नंतर उसाचा हंगाम संपल्यानंतर ही साखर बाजारपेठेत आणून जास्त दराने विक्री करून पैसा कमवायचा उद्देश यामागे आहे. मात्र, सरकार याची गंभीर दखल घेऊन कारवाई करणार आहे.

आयात कर (इम्पोर्ट ड्युटी) सध्या 50 टक्के असून, तो आता 100 टक्के करावा, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली जाणार आहे. साखर निर्यात केली तर आपल्याला 20 टक्के कर द्यावा लागतो. तो कर माफ करण्यात यावा. त्याचप्रमाणे 20 लाख मेट्रिक टन साखर अनुदान देऊन सक्तीने निर्यात केली तर बाजारातील भाव निश्‍चितच वाढू शकतात. त्यासाठी 30 ते 40 लाख मेट्रिक टन साखर बफर स्टॉक करावी लागेल, अशा मागण्या राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केलेल्या आहेत. त्यामुळे थोड्याच दिवसांत ही परिस्थिती पूर्व पदावर येईल, असे ना. खोत यांनी स्पष्ट केले.