Thu, Apr 25, 2019 05:30होमपेज › Ahamadnagar › चक्कर आल्याने दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

चक्कर आल्याने दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

Published On: Feb 04 2018 1:50AM | Last Updated: Feb 04 2018 12:58AMनगर : प्रतिनिधी

अचानक चक्कर येऊन बेशुद्ध पडल्याने दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. माळीवाडा व गोकुळवाडी परिसरात शुक्रवारी (दि. 2) या घटना घडल्या. याबाबत समजलेली माहिती अशी की, माळीवाड्यातील शेरकरगल्ली येथील नारायण पालिवाल यांची मुलगी तनीषा (वय 13) ही बाई ईचरजबाई फिरोदिया प्रशालेत इयत्ता सातवीत शिक्षण घेते. शुक्रवारी दुपारी ती शाळेतून घरी परतली. त्यानंतर पाणी पिल्यानंतर अचानक तिला चक्कर आली व बेशुद्ध पडली. बेशुद्ध पडताच तातडीने तिला रुग्णालयात हलविण्यात आले. 

वैद्यकीय अधिकार्‍यांनी तिला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात डॉ. कायगावकर यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दुसरी घटना सर्जेपुरातील गोकुळवाडी परिसरात घडली. आकाश देवीदास इंगळे हा मुलगा शुक्रवारी दुपारी घरी आला. पाणी पिताच चक्कर येऊन तो अचानक बेशुद्ध पडला. त्याला नातेवाईकांनी उपचारासाठी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्याला उपचारापूर्वीच मयत घोषित केले. डॉ. खटके यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दोघांच्या मृत्यूमागे उष्माघाताचे कारण असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, मृत्यूमागचे नेमके कारण अस्पष्ट आहे. दोन्ही मयत विद्यार्थ्यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली आहे. त्यांच्या अहवालानंतरच खरे कारण स्पष्ट होणार आहे.