Wed, Nov 14, 2018 16:39



होमपेज › Ahamadnagar › पथदिवे घोटाळ्यावर समितीचे शिक्कामोर्तब!

पथदिवे घोटाळ्यावर समितीचे शिक्कामोर्तब!

Published On: Jan 12 2018 1:50AM | Last Updated: Jan 11 2018 11:18PM

बुकमार्क करा




नगर : प्रतिनिधी

गेल्या दहा दिवसांपासून महापालिकेत गाजत असलेल्या 40 लाख रुपयांच्या पथदिवे घोटाळ्यावर चौकशी समितीने शिक्कामोर्तब केले. या प्रकरणात गंभीर अनियमिततेसह आर्थिक फसवणूक झाल्याचे अहवालात नमूद केल्याची माहिती आयुक्‍त घनश्याम मंगळे यांनी दिली. दरम्यान, अनियमितता सिद्ध झाल्याने बजेट रजिस्टरमध्ये सदर कामांसाठी तरतूद केली नसल्याचेही स्पष्ट झाल्याचे त्यांनी सांगितले.

महापालिकेचे विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे यांनी स्थायी समितीच्या सभेत विकासभार व रेखांकन सुधारणा लेखाशीर्षातून देयके अदा करण्यात आलेल्या 19 कामांचा मुद्दा उपस्थित करुन, यात घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. महासभेतही या मुद्द्यावरुन मोठा गदारोळ झाला होता. लेखापरीक्षकांनी त्यांची खोटी सही असल्याचे दोन्ही सभांमध्ये स्पष्ट केले.

त्यानंतर आयुक्‍त मंगळे यांनी यासंदर्भात अतिरिक्‍त आयुक्‍त विलास वालगुडे व नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक संतोष धोंगडे यांची चौकशी समिती नियुक्‍त केली होती. बुधवारी (दि.10) समितीने चौकशीचा अहवाल आयुक्‍तांकडे सादर केला होता. काल (दि.11) आयुक्‍तांनी याबाबत माहिती देताना मनपाची फसवणूक झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आल्याचे सांगितले.

शहरातील प्रभाग क्र.1 व 28 मध्ये प्रस्तावित करण्यात आलेल्या कामांबाबत तेथील नगरसेवकांचे जबाब घेण्यात आले. त्यांनी सदरची कामे सुचविली नसल्याचे जबाब दिले आहेत. तसेच चौकशीसाठी मूळ संचिका उपलब्ध झालेल्या नाहीत. संबंधित ठेकेदाराला सुनावणीसाठी नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, त्याने कुठलेही म्हणणे सादर केलेले नाही. संपूर्ण तपासणीअंती या प्रकरणात गंभीर अनियमितता व महापालिकेची आर्थिक फसवणूक झाली असल्याचे चौकशी अधिकार्‍यांनी अहवालात स्पष्ट केले आहे. अनियमितता सिद्ध झाल्यामुळे बजेट रजिस्टरमध्ये कामांची तरतूद नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. येत्या दोन दिवसांत संपूर्ण अहवाल, त्यातील निष्कर्ष व शिफारसींची माहिती घेऊन दोषींवर कारवाई करण्यात येईल, असेही आयुक्‍त मंगळे यांनी सांगितले.