Sun, May 19, 2019 14:46
    ब्रेकिंग    होमपेज › Ahamadnagar › उपायुक्त दराडे, ‘कॅफो’ झिरपे अटकेत

उपायुक्त दराडे, ‘कॅफो’ झिरपे अटकेत

Published On: Mar 09 2018 1:31AM | Last Updated: Mar 08 2018 11:43PMनगर : प्रतिनिधी

महापालिकेतील पथदिवे घोटाळ्यात निलंबित प्रभारी उपायुक्त विक्रम दगडू दराडे (30, रा. श्रीराम चौक, नगर) व मुख्य लेखा व वित्त अधिकारी (कॅफो) दिलीप रघुनाथ झिरपे (44, रा. एकवीरा चौक, नगर) या दोघांना काल (दि. 8) दुपारी तोफखाना पोलिसांनी अटक केली. तसेच याचवेळी सहाय्यक पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्या पथकाने फरार असलेला अभियंता रोहिदास सातपुते याच्या पिंपळगाव पिसा (ता. श्रीगोंदा) येथील फार्म हाऊसची झडती घेतली.

पोलिस कोठडीची मुदत संपल्याने या प्रकरणातील आरोपी ठेकेदार सचिन लोटके व गुरुवारी दुपारी अटक केलेल्या दराडे, झिरपे अशा तिघांनाही दुपारी प्रभारी मुख्य न्यायदंडाधिकारी चांदगुडे यांच्यासमोर हजर करण्यात आले. तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी दराडे व झिरपे या दोघांना 7 दिवस व ठेकेदार लोटके याला दोन दिवस पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. न्यायालयाने तीनही आरोपींना शनिवारपर्यंत (दि. 10) पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. सरकारी पक्षाच्या वतीने अ‍ॅड. क्रांती कुलकर्णी यांनी काम पाहिले.

महापालिकेतील पथदिवे घोटाळ्याच्या तपासात पोलिस कोठडीत असताना आरोपी लोटके याने प्रभारी उपायुक्त तथा सहाय्यक आयुक्त दराडे याला 2 लाख रुपये व कॅफो झिरपे याला दीड लाख रुपयांची लाच दिल्याची माहिती दिली होती. तसेच 10 कामांच्या बिलापोटी देण्यात आलेल्या धनादेशावर दोघांची स्वाक्षरी आहे. त्यांचा गुन्ह्याच्या कटात सहभाग दिसून येत आहे. त्यामुळे पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्या आदेशावरून दराडे व झिरपे या दोघांना पोलिस निरीक्षक सपकाळे, कर्मचारी मंगेश खरमाळे, राम सोनवणे आदींच्या पथकाने गुरुवारी दुपारी अटक केली. 

या दोघांच्या अटकेची कारवाई सुरू असतानाच पोलिसांच्या विशेष पथकाने फरार आरोपी सातपुते याच्या श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथील फार्म हाऊसवर छापा टाकला. सहाय्यक पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक विशाल सणस यांच्यासह सुमारे 20 पोलिसांच्या पथकाने सातपुते याच्या घराची झडती घेतली. पथदिव्यांच्या कामांच्या सातपुते याने गायब केलेल्या फायली येथे मिळतील, अशी पोलिसांना आशा होती. परंतु, येथे काहीही आढळून आले नाही. फार्म हाऊसवर सातपुते याचे कोणी नातेवाईकही नव्हते. फक्त रखवालदारीसाठी असलेले कामगार होते. त्यांनी अनेक दिवसांपासून रोहिदास सातपुते हा येथे आलाच नाही व संपर्कातही नाही, असे सांगितले. त्याचा मुलगा येथे येत असल्याची माहिती रखवालदाराने दिली.