Sat, Jul 20, 2019 08:46होमपेज › Ahamadnagar › आता उपायुक्त चव्हाण रडारवर

आता उपायुक्त चव्हाण रडारवर

Published On: Mar 09 2018 1:31AM | Last Updated: Mar 08 2018 11:32PMनगर : प्रतिनिधी

प्रभारी उपायुक्त विक्रम दराडे, कॅफो दिलीप झिरपे या दोघानंतर आता उपायुक्त राजेंद्र चव्हाण हे पोलिसांच्या रडारवर आहेत. त्यांच्या पथदिव्यांच्या बनावट कामांशी संबंधित काही कागदपत्रांवर सह्या आहेत. त्यांचा गुन्ह्यात काही संबंध आहे का, याची चौकशी केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच अटकेतील दोनही वरिष्ठ अधिकार्‍यांना महापालिकेत त्यांच्या कार्यालयात नेऊन चौकशी केली जाणार आहे. चौकशीत निष्पन्न झाल्यानंतर आरोपींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असल्याचेही पोलिस सूत्रांकडून समजले.

गुरुवारी दुपारी दराडे, झिरपे या दोघांना अटक केल्यानंतर पथदिवे घोटाळ्यात पोलिसांनी संशय व्यक्त केलेले महापालिका प्रशासनातील इतर अधिकार्‍यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. कामांच्या बिलापोटी ठेकेदार लोटके याला दिलेल्या काही धनादेशांवर उपायुक्त चव्हाण यांची स्वाक्षरी आहे. त्या सह्यांबाबत चव्हाण यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता ते काहीही उपयुक्त माहित देत नाहीत. तसेच चव्हाण यांचा गुन्ह्याशी काही संबंध आहे काय, याचा तपास करायचा असल्याचे पोलिसांनी न्यायालयात पोलिस कोठडीसाठी सादर केलेल्या अहवालात नमूद केलेले आहे. प्रभारी उपायुक्त दराडे याने जशा काही कामांच्या धनादेशावर सह्या केलेल्या आहेत, तशा चव्हाण यांच्याही काही कागदत्रांवर सह्या आहेत. त्यामुळे ते आता पोलिसांच्या रडारवर आले आहेत.

पोलिस चौकशीसाठी बोलाविण्यात आलेले संकेत कराड व अंकुश बोरुडे हे पसार झाले आहेत. त्यांच्या कुटुंबियांकडे चौकशी केली असता ते कामानिमित्त बाहेरगावी गेल्याचे सांगत आहेत. दोघांच्या खात्यावर 12 लाख 50 हजार रुपये पथदिव्यांच्या कामांसाठी आवश्यक असलेल्या साहित्याच्या मोबदल्यात दिलेले आहेत, असा लोटके याचा जबाब आहे. परंतु, साहित्य खरेदीबाबत तो काहीही कागदत्र उपलब्ध करून देत नाही. काहीही सांगत नाही. लोटके याने महापालिका पदाधिकार्‍याच्या कार्यालयातील एका कर्मचार्‍याला दीड लाख रुपये दिल्याचे सांगितले आहे. तो कर्मचारी व लोटके यांना समोरासमोर आणून तपास केला जाणार आहे. तसेच लोटके व दराडे, झिरपे यांनाही समोरासमोर आणून चौकशी केली जाणार असल्याचे सूत्रांकडून समजले.

फरार सातपुते हा दराडे, झिरपेच्या संपर्कात?
फरार असण्याच्या कालावधीत रोहिदास सातपुते हा विक्रम दराडे, दिलीप झिरपे या दोघांच्या संपर्कात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळालेली आहे. त्याबाबत चौकशी केली असता त्यांनी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत. आरोपींचे पद व शैक्षणिक पात्रता पाहता त्यांनी केलेले कृत्य अत्यंत धोकादायक व सार्वजनिक मालमत्तेस नुकसान पोहोचविणारे असल्याने दोघांचीही कसून चौकशी करण्यात येणार आहे.

फायली गायब करताना फोर्ड फिगोचा वापर
आरोपी रोहिदास सातपुते याने पथदिव्यांच्या कामांच्या मूळ सर्व 18 फायली गायब केल्याचे लोटके याने पोलिसांना सांगितलेले आहे. त्या फायली गायब करताना त्याने फोर्ड फिगो कारचा वापर केला असल्याचा जबाब दिलेला आहे. त्यामुळे पोलिसांकडून त्या वाहनाचा क्रमांक प्राप्त करून मालकीबाबत माहिती घेतली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.