Sun, Feb 24, 2019 08:46होमपेज › Ahamadnagar › सावळेला राहत्या घरातून अटक

सावळेला राहत्या घरातून अटक

Published On: Mar 22 2018 1:38AM | Last Updated: Mar 21 2018 11:45PMनगर : प्रतिनिधी

पथदिवे घोटाळ्यातील फरार आरोपी बाळासाहेब सावळे याला काल (दि. 21) सकाळी माळीवाडा येथील त्याच्या राहत्या घरातून तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता 26 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 

तसेच उपायुक्त राजेंद्र चव्हाण यांनीही जिल्हा व सत्र न्यायालयात अंतरिम अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला आहे. त्यावर म्हणणे सादर करण्यासाठी बुधवारी सरकारी पक्षाने मुदत मागितली. त्यामुळे या अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली अहे. न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी ठेकेदार सचिन लोटके यानेही मुख्य न्यायदंडाधिकार्‍यांसमोर जामिनासाठी अर्ज केलेला आहे. त्यावर गुन्ह्याचे तपासी अधिकारी सुरेश सपकाळे यांनी म्हणणे दिले आहे. या अर्जावर गुरुवारी (दि. 22) सुनावणी होणार आहे. 

गुन्हा दाखल झाल्यापासून बाळासाहेब सावळे हा फरार आहे. त्याचा जिल्हा व सत्र न्यायालयातील अंतरिम अटकपूर्व जामिनासाठी अर्ज फेटाळला होता. उच्च न्यायालयाने गुन्ह्यातील प्रमुख आरोपी रोहिदास सातपुते याचा जामीन अर्ज फेटाळून लावलेला आहे. त्यामुळे बाळाहेब सावळे हा बुधवारी सकाळी त्याच्या माळीवाड्यातील राहत्या घरी आला होता. सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास तोफखाना पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर दुपारी न्यायालयासमोर हजर केले. तपासी अधिकारी सपकाळे यांनी गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी आरोपी सावळे याला पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. न्यायालयाने 26 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.