Sun, Sep 23, 2018 09:50होमपेज › Ahamadnagar › जामिनासाठी सातपुते उच्च न्यायालयात 

जामिनासाठी सातपुते उच्च न्यायालयात 

Published On: Mar 19 2018 1:46AM | Last Updated: Mar 18 2018 10:48PMनगर : प्रतिनिधी

अटकपूर्व जामिनासाठी महापालिकेतील पथदिवे घोटाळ्यातील फरार आरोपी रोहिदास सातपुते याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे. त्यावर मंगळवारी (दि. 20) सुनावणी होणार आहे.

सातपुते याच्या अर्जानंतर उच्च न्यायालयाने सरकारी पक्षाला म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. त्यामुळे पोलिसांनी सातपुते याने पथदिवे घोटाळ्यासोबत महापालिकेत केलेल्या इतर घोटाळ्यांचीही माहिती मागविण्यास सुरुवात केलेली आहे. सातपुते याने यापूर्वी जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावेळी पोलिसांनी म्हणणे सादर करताना सातपुते याची पार्श्‍वभूमी घोटाळ्याचीच आहे. पथदिवे घोटाळ्यातील गायब मूळ फायली सातपुते याने त्याच्या कारमधून नेल्याचा जबाब अटकेतील ठेकेदाराने दिलेला आहे. त्यामुळे त्याचा जामीन अर्ज फेटाळण्याची मागणी केली होती. न्यायालयाने तो अर्ज फेटाळून लावला होता. हा अर्ज फेटाळल्यानंतर त्याने आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 

उच्च न्यायालयात म्हणणे सादर करण्यासाठी पोलिसांकडून कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू आहे. तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक सुरेश सपकाळे हे मंगळवारी औरंगाबाद खंडपीठात होणार्‍या सुनावणीसाठी जाणार आहेत. या सुनावणीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.