Fri, Mar 22, 2019 23:49होमपेज › Ahamadnagar › काल्पनिक कामांचीच बिले काढल्याचे उघड

काल्पनिक कामांचीच बिले काढल्याचे उघड

Published On: Feb 09 2018 1:58AM | Last Updated: Feb 08 2018 10:36PMनगर : प्रतिनिधी

पथदिवे घोटाळ्यात प्रकरणात बिले काढलेल्या कामांची तपासी अधिकार्‍यांनी अतिरिक्त आयुक्तांसमवेत पाहणी केली. त्यातील अनेक कामे प्रत्यक्षात झालेलीच नसल्याचे स्पष्ट झाले. काही कामे पथदिवे घोटाळा उघडकीस झाल्यानंतर घाईगडबीत उरकल्याचा जबाब नागरिकांनी दिला आहे. तसेच विशेष म्हणजे बिले काढलेल्या 3-4 कामांच्या जागाच प्रत्यक्षात आस्तित्वात नसल्याचे उघड झाले. त्यामुळे काल (दि. 8) केलेल्या पाहणीतून घोटाळ्याचा चांगलाच भांडाफोड झाला. 

अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे व तपासी अधिकारी सुरेश सपकाळे हे डॉन बॉस्को परिसरात पाहणीसाठी आल्याचे समजताच नगरसेवक संपत बारस्कर हे घटनास्थळी आले. पथदिवे घोटाळ्यात ज्या कामांवर बिले काढल्याचे नमूद आहेत, अशा ठिकाणी पोलिसांनी महापालिका अधिकार्‍यांसमवेत गुरुवारी पाहणी केली. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास मनपा व पोलिसांचे संयुक्त पथकाने पाहणीस सुरुवात केली. सावेडी उपनगरातील हुंडेकरी लॉनमागे, आठरे पाटील पब्लिक स्कूलसमोर, बंधन-सिद्धार्थ लॉन, डॉन बॉस्को परिसरातील कामांना भेटी दिल्या. 

पोलिसांनी पथदिव्यांच्या झालेल्या कामांबाबत घटनास्थळी भेट दिल्यानंतर तेथील काही नागरिकांचेही जबाब नोंदविले. काही कामे झालेलीच नाही, तर काही अर्धवट आढळली. अनेक कामे पथदिवे घोटाळा उघडकीस आल्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मदतीने पोल आणून घाईगडबडीत कामे उरकण्यात आल्याचे जबाब दिले. ते पोलिसांनी नोंदविले आहेत. पाहणीवेळी पोलिस व मनपा पथकाला काही कामांच्या जागाच प्रत्यक्षात दिसून आल्या नाहीत. संबंधित प्रभागात झालेली कामे म्हणून जो परिसर अथावा जागा नमूद केलेल्या आहेत, ती जागाच प्रत्यक्षात आस्तित्वात नाही. काल्पनिक रस्ते, परिसर नमूद करून त्याची बिले काढण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. 

दरम्यान, पोलिस कोठडीत असलेला आरोपी रमेश काळे याच्या पोलिस कोठडीची मुदत शुक्रवारी (दि. 9) संपत आहे. त्याला आज पोलिसांकडून न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. 10 दिवसांपासून लिपिक काळे हा पोलिस कोठडीत आहे.