Thu, Jun 27, 2019 18:04होमपेज › Ahamadnagar › मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळला 

मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळला 

Published On: Jul 27 2018 1:24AM | Last Updated: Jul 26 2018 10:11PM
ढोरजळगाव : वार्ताहर

सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी काल येथील मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन करत सुमारे दोन तास रास्ता रोको आंदोलन छेडले. या आंदोलनाचे नेतृत्व राजेंद्र देशमुख, संभाजी लांडे, काकासाहेब पाटेकर, ज्ञानेश्वर फसले, कैलास देशमुख, बाळासाहेब पाटेकर आदींनी केले. शेवगाव-पांढरीपूल रस्त्यावर ढोरजळगाव येथे पुकारलेल्या या आंदोलनादरम्यान सुमारे दोन तास वाहतूक खोळंबली होती. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. याप्रसंगी प्रमुख वक्त्यांनी फडणवीस सरकारवर ताशेरे ओढत तीव्र शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.

हे सरकार मराठा समाजाचा अंत पहात असून तब्बल 58 मोर्चे शांततेत काढलेल्या समाजाच्या भीतीने महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच झेड सुरक्षा असणार्‍या मुख्यमंत्र्यांना पंढरपूरला येता आले नाही यावरूनच समाजाची ताकद ओळखावी.सत्तेत असलेल्या 140 मराठा आमदारांनी त्वरित राजीनामे द्यावेत.ज्या आमदारांनी मराठा आरक्षणासाठी राजीनाम्याचे पाउल उचलले,अशा आमदारांचे यावेळी आभार मानण्यात आले. मंडलाधिकारी कणगरे यांना निवेदन देण्यात आले. 

शेवगावचे पोलिस निरीक्षक गोविंद ओमासे, उपनिरीक्षक नितीन मगर, सहा. उपनिरीक्षक भाऊसाहेब गिरी, पो.कॉ.ज्ञानेश्वर माळवे, पालवे, ढाके आदींनी चोख बंदोबस्त ठेवला. याप्रसंगी डॉ.प्रदीप पाटेकर, योगेश देशमुख, डॉ.देविदास देशमुख, शरद फसले, डॉ.सुनील जिवडे, दिगंबर देशमुख,अरुण गरड, आकाश साबळे, रवींद्र डाके, गणेश गिर्‍हे, गणेश पाटेकर यांसह परिसरातील ग्रामस्थ सहभागी होते. दुकानदारांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवल्याने दिवसभर व्यवहार ठप्प होते.