Wed, Aug 21, 2019 15:13होमपेज › Ahamadnagar › अत्याधुनिक ईव्हीएम नगरला दाखल

अत्याधुनिक ईव्हीएम नगरला दाखल

Published On: Aug 09 2018 1:35AM | Last Updated: Aug 08 2018 11:44PMनगर : प्रतिनिधी

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आवश्यक असणारी अत्याधुनिक (एम-3) मतदान यंत्रे जिल्ह्यात दाखल झाली आहेत. सदर यंत्रे केडगाव येथील गोदामात कडक सुरक्षा व्यवस्थेत ठेवली गेली आहेत. जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी गोदामाला भेट देवून, मतदान यंत्रांची पाहणी केली. 

लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर येवून ठेपली आहे. या निवडणुकीची पूर्वतयारी भारत निवडणूक आयोगाकडून जोमात सुरु आहे. या निवडणुकीसाठी नवीन एम-3 प्रकारची अत्याधुनिक ईव्हीएम वापरण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. त्यासाठी बेंगलोर येथील भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीकडून यंत्रे उपलब्ध केली जात आहेत. नगर जिल्ह्यात कोपरगाव व दक्षिण नगर असे दोन मतदारसंघ आहेत. या दोन्ही मतदारसंघांत 3 हजार 722 मतदान केंद्र असणार आहेत. जिल्ह्यासाठी एम-3 प्रकारचे 8 हजार 20 बॅलेट युनिट (बीयू) व  4 हजार 600 कंट्रोल युनिटची (सीयू) आवश्यकता आहे. आयोगाच्या आदेशानुसार सदर यंत्रे आणण्यासाठी नगरहून शुक्रवारी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप आहेर, नायब तहसीलदार जयसिंग भैसाडे, अव्वल कारकून विजय धोत्रे व प्रसाद गर्जे या महसूल अधिकारी व कर्मचार्‍यांसह आठ हत्यारी पोलिसांचे एक संयुक्‍त पथक बेंगलोरला रवाना झाले होते. 

पाच ट्रक भरुन अत्याधुनिक यंत्रे घेवून सदर पथक मंगळवारी रात्री उशीरा नगरला पोहोचले. काल (दि.8) सकाळी मतदान यंत्रे केडगाव येथील पुरवठा  विभागाच्या गोदामात उतरविण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी या अत्याधुनिक यंत्रांची पाहणी करुन, काही सूचना केल्या. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी प्राजित नायर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर, उपवनसंरक्षक एम. आदर्श रेडडी, तहसीलदार सुधीर पाटील आदींची उपस्थिती होती.

गोदामाभोवती सीसीटीव्ही

बेंगलोरहून आणलेले अत्याधुनिक मतदान यंत्रे केडगाव येथील गोदामात ठेवून ते सायंकाळी सील करण्यात आले आहे. या गोदामाभोवती आता सीसीटीव्ही कॅमेरे लावली गेली आहेत. या गोदामाला 24 तास एक पोलिस अधिकारी व तीन सशस्त्र पोलिसांचा कडक पाहारा असणार आहे.