Tue, Jul 16, 2019 02:01होमपेज › Ahamadnagar › गव्हाणेवाडी येथे गोळीबार

गव्हाणेवाडी येथे गोळीबार

Published On: Jan 24 2018 1:23AM | Last Updated: Jan 23 2018 11:17PMश्रीगोंदा : प्रतिनिधी 

नगर-पुणे रस्त्यावर शिरूरजवळ असलेल्या श्रीगोंदा तालुक्यातील  गव्हाणेवाडी येथे काल (दि.23) दुपारी क्रिकेट सामान्यात झालेल्या किरकोळ वादावादीचे रूपांतर गोळीबार करण्यात झाले. आधीच्या वादात दादा गव्हाणे जखमी झाला असून, नंतर दादा गव्हाणे याने स्वत:कडे असलेल्या गावठी कट्ट्यातून केलेल्या गोळीबारात नीलेश काळे हा गंभीर जखमी झाला आहे. काळे याला  उपचारासाठी पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  तर गव्हाणे हा फरार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. याबाबत पोलिस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की  गव्हाणवाडी शिवारात ओम साई तरुण मंडळाने क्रिकेट स्पर्धा आयोजित  केलेली आहे. काल दुपारी सुरू असलेल्या  सामन्यादरम्यान ‘नो बॉल’वरून वाद झाला. त्यावरून दादा गव्हाणे याने नीलेश काळे याचा मावसभाऊ अक्षय काळे यास मारहाण केली. त्यानंतर दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. त्यामुळे क्रिकेट स्पर्धा बंद होऊन गावात एकच घबराट निर्माण झाली.

दुपारी चारच्या सुमारास हा प्रकार निलेश काळे याला समजताच, त्याने ग्रामपंचायत कार्यालयानजिक राहणार्‍या दादा गव्हाणे याच्या घरी दुचाकीवरुन धाव घेतली. घराच्या प्रांगणातच या दोघांमध्ये वादावादी व नंतर हाणामारी सुरु झाली. त्याच दरम्यान दादा गव्हाणे  याने त्याच्याकडे असलेल्या गावठी कट्ट्यातून निलेश काळे याच्यावर समोरून गोळ्या झाडल्या. या गोळीबारानंतर निलेश काळे हा जागीच कोसळला. त्यानंतर दादा गव्हाणे याने घटनास्थळावरुन पळ काढला. गोळीबाराचा मोठा आवाज झाल्याने, आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत, निलेश याला सुरुवातीला शिरूर येथे व नंतर पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. 

घटनेची माहिती समजताच बेलवंडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र पडवळ यानी फौजफाट्यासह  घटनास्थळी धाव घेतली. अप्पर पोलिस अधीक्षक घनशाम पाटील यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना केल्या. गावात तणावपूर्ण शांतता असून, जादा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, गव्हाणे याच्या घरासमोर सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने संपूर्ण घटनाक्रम त्यामध्ये कैद झाला आहे. पोलिसांनी तपासाच्या दृष्टीनेे हे फुटेज ताब्यात घेतले आहे. तसेच पोलिसांनी घटनास्थळावरुन 2 जिवंत काडतुसे व वापरलेल्या तीन पुंगळ्या जप्त केल्या आहेत. यावरून गव्हाणे याने गावठी कट्ट्यातून तीन गोळ्या झाडल्याचे दिसून येत आहे.

  वादामागे क्रिकेट की दुसरे कारण? 

दरम्यान, क्रिकेटच्या वादावादीतून हा गोळीबार झाल्याचे सांगण्यात येत असले तरी, त्यातून गोळीबारापर्यंत मजल जाणे संयुक्तिक वाटत नाही. त्यामुळे पोलिस या दोघांची पार्श्‍वभूमी तपासत आहेत. तालुक्यातील घोड नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात बेकायदा वाळू उपसा सुरु आहे. नदीपात्रात दहशत निर्माण करण्यासाठी या भागातील अनेक वाळू तस्करांकडे गावठी कट्टे असल्याची माहिती समोर येत आहे.