Sun, Jul 21, 2019 08:22होमपेज › Ahamadnagar › जमिनीसाठी साडेपाच वर्षांच्या चिमुरड्याचा खून

जमिनीसाठी साडेपाच वर्षांच्या चिमुरड्याचा खून

Published On: Feb 10 2018 2:08AM | Last Updated: Feb 10 2018 2:08AMश्रीगोंदा : प्रतिनिधी 

श्रीगोंदा तालुक्यातील भिंगाण येथील साडेपाच वर्षीय बालकाच्या खुनाचा उलगडा करण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. वडिलोपर्जित जमिनीत वाटेकरी होऊ नये, यासाठी मोठ्या सख्ख्या भावानेच सासूच्या सांगण्यावरून या चिमुरड्याचा डोक्यात दगड घालून खून केल्याचेे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी याप्रकरणी भाऊ, भावजय व भावाच्या सासूला अटक केली आहे.

बाल्या ऊर्फ वैभव बापू पारखे (वय 5 वर्षे 6 महिने) असे खून झालेल्या चिमुरड्याचे नाव आहे, तर शांतीलाल बापू पारखे, त्याची पत्नी काजल शांतीलाल पारखे व सासू संगीता अंकुश तांबे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, वैभव पारखे याचे भिंगाण येथून 13 नोव्हेंबर 2017 रोजी दुपारी अपहरण झाल्याची फिर्याद वडील बापू पारखे यांनी दिली होती. त्यानुसार पोलिसांचा तपास सुरु होता. तपासादरम्यान  तब्बल  तेरा दिवसांनी वैभवचा मृतदेह घराच्या बाजूलाच सापडला होता. वैभव याच्या डोक्याला इजा झाल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले होते. शवविछेदनादरम्यान व्हिसेरा राखून ठेवण्यात आला होता. या व्हिसेराचा अहवाल पोलिसांना नुकताच प्राप्त झाला होता. त्यात त्याच्या डोक्यात दगडसदृश वस्तूने मारहाण झाल्याचे स्पष्ट झाले होते. 

या प्रकरणाचा पोलिसांकडून वेगवेगळ्या बाजूंनी तपास सुरू होता. त्याच दरम्यान पोलिसांना गुप्त खबर्‍यामार्फत शांतीलाल पारखे यानेच वैभवचा खून केल्याची माहिती मिळाली. 

त्यानुसार पोलिसांनी त्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष केंद्रीत केले. या दरम्यान पोलिसांची शंका खात्रीत रूपांतरित झाली. त्यानंतर पोलिसांनी गुरूवारी (दि.8) रात्री शांतीलाल याला ताब्यात घेत चौकशी केली असता, तो उडवाउडवीची उत्तर देऊ लागला. मात्र, पोलिसी खाक्या दाखविताच त्याने आपणच खून केल्याची कबुली दिली. वडिलांना अडीच एकर शेती आहे. तब्बल बावीस वर्षांनंतर भाऊ झाल्याने तो या जमिनीत वाटेकरी झाल्याची भावना शांतीलाल याच्या मनात सलत होती. त्याच दरम्यान तो पत्नी काजलसमवेत न्हावरा (ता.शिरूर) येथे सासुरवाडीला गेला होता. तिथे त्याने जमिनीच्या हिस्स्यावरुन सासू संगीता तांबे हिच्याशी चर्चा केली. जमिनीत वाटेकरी नको असेल, तर वैभवचा खून करणे, हा एकमेव मार्ग असल्याचे सांगत, तिने जावई शांतीलाल याला त्यासाठी उद्युक्त केले. 

सासुरवाडीवरून भिंगाण येथे आल्यानंतर तिन्ही आरोपींनी नियोजन करत खुनाचा कट रचला. सोमवारी श्रीगोंद्याचा बाजार असल्याने, गावात कुणीच नसेल, यासाठी हा दिवस निवडण्यात आला. गावातील बहुतेक लोक बाजाराला गेलेले असल्याची संधी साधून, 13 नोव्हेंबर 2017 रोजी दुपारी वैभव घरात झोपलेला असताना शांतीलाल याने त्याच्या डोक्यात  दगड घालून  खून केला. या कृत्यात पत्नी काजल हिनेही त्याला मदत केली. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने वैभवचा मृतदेह घराच्या बाजूला असणार्‍या काटवनात नेऊन टाकला. तिथेही त्याचे डोके  कुर्‍हाडीने पुन्हा फोडले. त्यानंतर घरात रक्ताने माखलेल्या चादरी व इतर कपडे पेटवून दिले व घरातील कपडे स्वच्छ धुवून टाकले.

पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक महावीर जाधव यांनी अतिशय शिस्तबद्धरित्या तपास करत, या खुनाचा उलगडा करण्यात अखेर यश मिळविले. आपल्या मुलाचा मोठ्या मुलानेच संपत्तीसाठी खून केल्याचे समोर येताच मृत वैभवच्या आईने टाहो फोडला. त्यामुळे पोलिसही स्तब्ध झाले.