Sun, Jul 21, 2019 16:15
    ब्रेकिंग    होमपेज › Ahamadnagar › सोनई हत्याकांडातील आरोपीचा झाला मृत्यू

सोनई हत्याकांडातील आरोपीचा झाला मृत्यू

Published On: Jun 24 2018 1:32AM | Last Updated: Jun 23 2018 11:41PMनेवासा :  प्रतिनिधी  

सोनई हत्याकांडात मृत्यूदंडांची शिक्षा झालेल्या आरोपी पोपट रघुनाथ उर्फ विश्‍वनाथ दरंदले (55) याचा काल (दि.23) सकाळी नाशिक मध्यवर्ती कारागृहात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. पोपट दरंदले हा तुरूंगात असताना त्याला काल ह्रदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी दरंदले यास मृत घोषित केले.

नेवासा फाटा येथील बी.एड. महाविद्यालयातील एका सवर्ण मुलीचे मेहतर समाजातील सचिन सोहनलाल घारू (23) या मुलाशी प्रेमसंबंध होते. हे दोघेही विवाह करतील, असा संशय मुलीच्या कुटुंबीयांना होता. यामुळे त्यांनी सचिनची हत्या करण्याचा कट रचला. स्वच्छतागृहाची टाकी साफ करण्याच्या बहाण्याने विठ्ठलवाडी येथे दरंदले वस्तीवर सचिनला बोलावण्यात आले. सचिन हा राहुल ऊर्फ तिलक राजू कंडारे (26) आणि संदीप राजू थनवार (24) या दोघा मित्रांसह तेथे आला. टाकी स्वच्छतेचे काम सुरू असतानाच या तिघांची निर्घृण हत्या करण्यात आली. 

विळा आणि चारा कापण्याच्या अडकित्त्याने मृतदेहाचे तुकडे करण्यात आले. 1 जानेवारी 2013 रोजी हे हत्याकांड घडले होते. स्वच्छतागृहाच्या टाकीत पडून सचिनचा मृत्यू झाल्याचा बनाव करण्यात आला होता.

याप्रकरणी सातजणांना 5 जानेवारी 2013 ला अटक करण्यात आली होती. संपूर्ण राज्याला हादरवून टाकणार्‍या या हत्याकांडातील सहा दोषींना जानेवारी महिन्यात नाशिकचे जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. आर. वैष्णव यांनी मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावली होती. तेव्हापासून हे आरोपी नाशिकमध्ये कोठडीत आहेत. त्यातील पोपट दरंदले याचा काल (दि.23) सकाळी नाशिक मध्यवर्ती कारागृहात मृत्यू झाला आहे. गेल्या चार महिन्यांपासून तो नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात होता. नाशिकरोड कारागृह अधीक्षक राजकुमार साळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोपट दरंदलेची प्रकृती गुरुवारी बिघडली होती. त्यामुळे त्याला नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान काल सकाळी त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्याचा मृतदेह धुळे येथील मेडिकल कॉलेजमध्ये शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.