Sun, Jul 21, 2019 08:17होमपेज › Ahamadnagar › अवैध धंद्यांमुळे वाढले टोळीयुद्ध

अवैध धंद्यांमुळे वाढले टोळीयुद्ध

Published On: Dec 26 2017 1:31AM | Last Updated: Dec 26 2017 1:31AM

बुकमार्क करा

सोनई : वार्ताहर

गेल्या कित्येक वर्षापासून शनी शिंगणापूर व सोनई परिसरात रासरोजसपणे चालू असलेले मटका, जुगार व दारू या अवैध धंद्यांना आवर घालण्यात पोलिस यंत्रणा कुचकामी ठरली. त्यामुळेच शिंगणापूर व सोनई पोलिस ठाणे हद्दीत गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढून तिचे टोळीयुध्द, खून, हाणामार्‍या, दहशत यात रूपांतर झाले असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे भाविक येणारे शनि शिंगणापूर तसेच शांत सुसंस्कृत म्हणून पूर्वी ओळख असलेला सोनई परिसर केवळ बेकायदा धंदे व गुन्हेगारांमुळे बदनाम होत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्‍त होत आहे.

नुकताच शनि शिंगणापूर येथे भर चौकातील पार्कींग पटांगणात टोळी युध्दातून एकाचा भिषण खून करण्यात आला. शिंगणापूर पोलिस ठाण्यापासून घटनास्थळ अंदाजे 1 हजार फुटांवर आहे. ज्याचा खून झाला तो आणि आरोपी हे दोघेही पोलिस रेकॉडीवर आहेत. वेगवेगळया पोलिस ठाण्यांत त्यांच्यावर विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. अंतर्गत व्यवहार आणि वर्चस्वाच्या लढाईतून टोळीयुध्द झाल्याची शक्यता पोलिस वर्तुळात व्यक्‍त केली जात आहे. परंतु स्थानिक पोलिस यंत्रणेला याबाबद काहीच गुप्‍त माहिती मिळाली नाही अथवा माहिती गृहीत असताना कुठल्याही कठोर कारवाया झाल्या नाहीत, हे सपशेल अपयश मानले जात आहे.

शिंगणापूर व सोनई परिसर गुन्हेगारांचे आश्रयस्थान असल्याच्या या चर्चा केल्या जात आहेत. कारण या भागात बहुतांश व्यावसयिकांडे गावठी कट्टे आहेत. यापूर्वी तोफखाना पोलिस व जिल्ह्यातील इतर पोलिस ठाण्यांनी सोनई, शिंगणापूर 8 ते 10 जणांवर गुन्हे दाखल करून कित्येक दिवस न्यायलायीन कारवाईत अडकवले होते. मात्र स्थानिक पोलिसांनी त्यानंतर या कट्टे वाल्यांवर कधी ठोस कारवाई  केल्याचे ऐकीवात नाही. आताही बर्‍याच जणांकडे कट्टे असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खुनाच्या घटनास्थळी दोन गावठी कट्टे पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती आहे. गावठी कट्टे बाळगणार्‍यांवर पोलिसांचे दुर्लक्ष का होत आहे, या बाबदही चौकशीची गरज व्यक्‍त केली जात आहे.