Fri, Jul 10, 2020 20:30होमपेज › Ahamadnagar › भूतकर प्रकरणी ७ जणांवर गुन्हा

भूतकर प्रकरणी ७ जणांवर गुन्हा

Published On: Dec 22 2017 1:24AM | Last Updated: Dec 21 2017 11:01PM

बुकमार्क करा

सोनई : वार्ताहर

शिंगणापूरातील गणेश भूतकर हत्येप्रकरणी गुरुवारी  पहाटे 5.30 वाजता शनिशिंगणापूर पोलिस ठाण्यात 7 जणांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. दुपारी 1 वाजता मयत भूतकर याचा मृतदेह औरंगाबाद घाटी रुग्णालयातून शिंगणापूर येथे आणण्यात आला. दिवसभर शिंगणापूर बंद होते. सायंकाळी काही प्रमाणात दुकाने उघडली.

मयत गणेशचा भाऊ रामेश्‍वर मच्छिंद्र भूतकर याने शिंगणापूर पोलिस ठाण्यात लेखी फिर्याद दिली की, दि. 20 रोजी सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान दत्तू बानकर यांच्या मालकीच्या पटांगणातील शनिराज पार्किंगमध्ये अविनाश चांगदेव बानकर, पंकज बानकर, अर्जुन सुरेश महाले, लखन नामदेव ढगे, भाऊराव ढमाले (सर्व रा. शिंगणापूर) व मयूर हरकल, गणेश सोनवणे (रा. घोडेगाव, ता. नेवासा) व इतर 2 ते 3 अज्ञात तरुणांनी गणेश भूतकरवर तलवार, कुर्‍हाड, लाकडी दांडके व गावठी कट्ट्यांचा वापर करुन मागील शेतीच्या व्यवहाराच्या कारणावरुन हल्ला केला. त्यावेळी गणेशच्या छाती, हात, डोक्याला गंभीर स्वरुपाच्या जखमा झाल्या. त्यात तो मृत्यू पावला. या फिर्यादीवक्षुन पोलिसांनीी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक निरीक्षक संगीता राऊत पुढील तपास करीत आहेत. 

कालच्या घटनेनंतर जिल्हा पोलिस अधिक्षक रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलिस अधीक्षक रोहिदास पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत पुढील मार्गदर्शन केले. तर शेवगाव विभागाचे पोलिस उपअधीक्षक अभिजित शिवथरे यांनी गुरुवारी दिवसभर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला. दुपारी अंत्यविधीचे वेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. चोहोबाजूंनी पोलिस बंदोबस्त तैनात होता. सध्या शिंगणापूर येथे ट्रायकिंग फोर्स पथक, सोनईचे 10, नेवासा 15, शिंगणापूर 30 एवढे पोलिस कर्मचारी गावभर पोलिस बंदोबस्तासाठी नेमण्यात आलेले असून वेगवेगळे पॉईंट व फिरती गस्त पहारा देत आहेत. ठसे तज्ज्ञ व फॉरेन्सीक लॅब व्हॅनचे रक्त व पावलांचे ठसे घेतलेले आहेत. शिंगणापूर व्यावसायिकांनी आपापले व्यवहार बंद ठेवलेले होते. पण दुपारी पानसनाला अलीकडचे पार्किंगमधील दुकाने उघडण्यात आली. शनिदर्शनासाठी येणारे भाविकांना काल प्रसाद, पानफुल, तेल मिळू शकले नाही. तसेच चहा, नाष्टासुध्दा मिळू शकला नाही. तेव्हा बाहेरचे भाविक कशामुळे बंद याबाबत चर्चा करीत होते. 

दरम्यान, गुन्ह्यात वापरण्यात आलेले विनाक्रमांकाचे वाहन काल गणेशवाडी (ता. नेवासा) येथील किसनदेव बेल्हेकर यांच्या शेतात सापडले. पोलिसांनी ते ताब्यात घेतले आहे. मयत व आरोपी दोघांवर सुध्दा सोनई, शनि शिंगणापूर व नगर पोलिसांत विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी सोनई, शिंगणापूरचे स्थानिक अधिकारी व पोलिस कर्मचार्‍यांची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.