Tue, Apr 23, 2019 10:13होमपेज › Ahamadnagar › ट्रक-पिकअपच्या अपघातात बापलेक ठार

ट्रक-पिकअपच्या अपघातात बापलेक ठार

Published On: Aug 14 2018 1:11AM | Last Updated: Aug 14 2018 1:11AMशिरूर : प्रतिनिधी

शिरूर-चौफुला रस्त्यावर ट्रक व पिकअप जीपची समोरासमोर धडक होऊन पिकअपमधील बापलेक ठार झाले. या दुर्घटनेत अन्य तीघे जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी (दि. 13) सकाळी सव्वाआठ वाजता झाला. अपघातात ठार झालेल्या बापलेकाची नावे कैलास रामपाल बंजारा (वय 22) आणि रामपाल मधाराम बंजारा (वय 65, सध्या रा. केडगाव चौफुला, ता. दौंड, मूळ रा.कुचेरा, जि. नागोर, राजस्थान) अशी आहेत. तर बुधाराम बंजारा, सुनील गिरी, नेमाराम चौधरी हे तिघे जखमी झाले आहेत. 

याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी राजस्थान येथील आपल्या कुचेरा गावी जाण्यासाठी बंजारा कुटुंब हे शिरूर-न्हावरे फाटा येथे येऊन येथून ट्रव्हल्सने जाणार होते. त्यासाठी त्यांनी केडगाव (ता. दौंड) येथून ते पिकअप जीप (एमएच 12 पीक्यू 9594) हिने न्हावरे फाटा येथे निघाले होते. दरम्यान, पिकअप जीप करडे घाटातील कालव्याजवळ आली असता पिकअप जीप व न्हावरे फाटा बाजूने समोरून येणारा ट्रक (एनएल 01 एन 8690) यांची समोरासमोर धडक झाली. 

यात पिकअप जीपचा समोरील भाग चक्काचूर झाला. यामध्येपिकअप जीपमधील कैलास व रामपाल बंजारा हे ठार झाले. मयत बंजारा कुटुंब केडगाव चौफुला येथे फर्निचर बनवण्याचा व्यवसाय करीत होते. न्हावरे फाटा केवळ एक किलोमीटर राहला असता बंजारा कुटुंबावर काळाने घाला घातला. अपघातानंतर ट्रक चालक पळून गेला आहे.याबाबत देवीसिंग हरिसिंग रजपूत यांनी पोलिसांना माहिती दिली असून, शिरूर पोलिस स्टेशन येथे मोटार अपघात नोंद झाली आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक भगवान पालवे करीत आहेत.