Sun, Apr 21, 2019 01:52होमपेज › Ahamadnagar › संतांचे विचार सूर्यासारखे प्रखर : रामगिरी 

संतांचे विचार सूर्यासारखे प्रखर : रामगिरी 

Published On: Dec 19 2017 1:55AM | Last Updated: Dec 18 2017 11:17PM

बुकमार्क करा

श्रीरामपूर : प्रतिनिधी 

मनुष्य देह मिळाल्यानंतर या जन्माचे नेमके प्रयोजन काय आहे, हे प्रत्येकाला कळणे गरजेचे आहे. मृत्यूलोकात माणूस स्वार्थासाठी जागा आहे. परंतु आत्मकल्याणासाठी अज्ञानी आहे आणि लोकांचे हे अज्ञान दूर करण्याचे कार्य सद‍्गुरू गंगागिरी महाराज व संतांनी सोप्या साध्या शब्दातील ग्रंथ विचारातून केले. म्हणूनच संतांचे विचार आजही सूर्यासारखे प्रखर आहेत. या विचारांचे सर्वांकडून आचरण होणे हाच खरा परमार्थ असल्याचा उपदेश महंत रामगिरी महाराजांनी भाविकांना केला.

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान सराला बेटाचे योगीराज सद‍्गुरू गंगागिरी महाराज यांच्या 115 व्या पुण्यतिथी महोत्सवात (दि. 17) गुरूचरित्रपर  कीर्तनातून संत तुकाराम महाराज यांच्या उपदेशपर प्रकरणातील ‘येतील अंतरा, ज्येष्ठांचे अनुभव’ या अंभगाचे निरुपण महंत रामगिरी महाराजांनी केले. ते म्हणाले की, माणसाने काही गोष्टी विचारल्या, तर सांगाव्यात, काही गोष्टी विचारल्या तरी सांगू नयेत आणि काही गोष्टी नाही विचारल्या तरी सांगाव्यात, हे तत्त्वज्ञान प्रत्येकाला कळावे, यासाठी संत विचार आहेत. मृत्यूलोकात माणूस स्वार्थासाठी जागा, पण आत्मकल्याण, स्वहितासाठी तो अज्ञानी आहे आणि म्हणूनच जन्म-मरणाचा फेरा संपत नाही. 

समाजातील लोकांचे अज्ञान दूर करण्याचे कार्य सर्व संतांनी केले. त्यासाठीच त्यांनी कोणी विचारले नाही, तरी समाजाला त्यांच्या हितासाठी उपदेश केला. कारण अज्ञानी माणसाला उपदेश करण्याचा अधिकार संतांना होता. संतांनी केलेला उपदेश लोकांच्या भल्यासाठीच आहे, म्हणून ‘संत विचार अंगिकारा, आचरणात आणा’ असे आवाहन रामगिरी महाराजांनी केले. 

वेदात विश्वाला सामावून घेणारे ज्ञान आहे. परंतू वेदातील हे ज्ञान अज्ञानी समाजाला कळावे, यासाठी श्रृती, स्मृतीनंतर उपनिषेद त्यानंतर भगवदगितेत हे ज्ञान मनुष्यापर्यंत पोहोचविण्यात आले. त्याहीपुढे जाऊन संत ज्ञानेश्वर माऊलींनी भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरीतून हे ज्ञान सोप्या-साध्या भाषेतून समाजापुढे मांडले. जगाचये कशासाठी, आणि या जन्माचे प्रयोजन कोणते हे कळण्यासाठीचा मार्ग योगीराज गंगागिरी महाराजांनी समाजाला दाखविला, म्हणूनच अंधःकाराकडून प्रकाशाकडे नेण्याचे महत कार्य सर्व संतांनी केले, असे  रामगिरी महाराजांनी सांगितले. यावेळी  विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ  बागडे  म्हणाले की, ऋषी व कृषी संस्कृतीमुळे देश व राज्य महासत्तेकडे प्रवास करीत आहे. बेटात संत समाधी दर्शनाने मन निर्मळ होत असल्याचे ते म्हणाले.

या कीर्तनाला खासदार चंद्रकांत खैरे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, प्रा. रमेश बोरनारे, आ. भाऊसाहेब कांबळे, भाजपा जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, बाळासाहेब कापसे, पंकज ठोंबरे आदींसह लाखोंच्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती.दरम्यान, या सोहळ्याची सांगता सोमवारी महंतगिरी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.