Sun, Jun 16, 2019 02:51होमपेज › Ahamadnagar › मी तेल लावलेला पहिलवान

मी तेल लावलेला पहिलवान

Published On: Jan 17 2018 1:55AM | Last Updated: Jan 16 2018 10:25PM

बुकमार्क करा
श्रीरामपूर : प्रतिनिधी

राहुरीतून अनेकजण अंगाला हळद लावून तयार आहेत. मात्र, मी अंगाला तेल लावलेला पहिलवान असल्याने विरोधकांच्या डावात कधीच सापडणार नाही, असा विश्‍वास व्यक्त करतानाच राहुरीतील प्रलंबित सर्व प्रश्‍न मार्गी लावण्याचे काम करणार असल्याची ग्वाही, आ. शिवाजीराव कर्डिले यांनी दिली.

 राहुरी तालुक्यातील उंबरे येथील आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरणप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ग्रा. पं. सदस्य बाबासाहेब ढोकणे होते. व्यासपीठावर बाळकृष्ण बानकर, विक्रम तांबे, राजेंद्र ढोकणे, भाऊसाहेब दुशिंग, संतोष ढोकणे उपस्थित होते. 

आ. कर्डिले म्हणाले की, जनता हीच माझी प्रॉपर्टी आहे. जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील असतो. उंबरे गावाला सोनई  पाणीयोजनेतून पाणी मिळवून देण्याचे श्रेय काहीजण घेत आहेत. मात्र, रास्तारोको, आंदोलने करून प्रश्‍न सुटत नाहीत. त्यासाठी पाठपुरावा करावा लागतो. मी याप्रश्‍नी मुंबईत पाठपुरावा केल्याने हे यश मिळाले आहे. लवकरच मुळा धरणातून उंबरेसह अन्य वंचित गावांना पाणी योजना कार्यान्वित करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. याशिवाय उंबरे गावातील रस्तेदुरुस्तीसाठी विशेष प्राधान्य देणार आहे, असे सांगून उंबरे गावातील कुस्ती शौकिनांसाठी मॅट उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांनी दिली.

दरम्यान, आमदार चषक बाभळेश्‍वर स्पीड संघाने पटकावला तर द्वितीय ओम साई लोणी, तृतीय पारितोषिक दोस्ती उंबरे व चतुर्थ बक्षिस हेड अ‍ॅण्ड टेल संघाने मिळविले.
 प्रास्ताविक ज्ञानेश्‍वर क्षीरसागर तर आभार नंदू ढोकणे यांनी मानले.