Sat, Jul 20, 2019 10:37होमपेज › Ahamadnagar › स्व. आदिक देवमाणूस : प्रा. देशमुख

स्व. आदिक देवमाणूस : प्रा. देशमुख

Published On: Jan 06 2018 1:17AM | Last Updated: Jan 05 2018 11:03PM

बुकमार्क करा
श्रीरामपूर : प्रतिनिधी

समाजासाठी संपूर्ण आयुष्य झिजविणारे व समाजासाठी संघर्ष करणारे स्व. गोविंदराव आदिक देवाघरचा माणूस होता. त्यांनी शेवटपर्यंत मनातील माणूस जीवंत ठेवल्याने आयुष्यात मोठी उंची गाठू शकले, असे गौरवोद्गार व्याख्याते प्रा. एस. झेड. देशमुख यांनी काढले.

महाराष्ट्र कृषक समाजाच्यावतीने येथील नगरपरिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात स्व. गोविंदराव आदिक यांच्या 79 व्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात ‘तरुणांपुढील आव्हाने’ या विषयावर प्रा. देशमुख बोलत होते. यावेळी आ. भाऊसाहेब कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, खा. गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी. आर. आदिक उपस्थित होते.

प्रा. देशमुख म्हणाले की, संघर्ष प्रत्येकाच्या जीवनात असावा. त्याशिवाय माणूस घडूच शकत नाही. स्व. गोविंदराव आदिक यांनी आयुष्याची सुरुवात शेतकर्‍यांची वकिली करण्यापासून केली. शेवटपर्यंत शेतकरी, कामगार, बेरोजगारांसाठी झटताना आपले राजकीय विचार संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचविण्याचे काम केले. आदिकांच्या वक्तृत्वामध्ये संगीत होते. त्यांचे विचार ऐकणारा व प्रभावित झालेला मी एक चाहता आहे. त्यांनी माणसं जोडण्याचे काम केले. त्यामुळे त्यांची उणीव आज प्रत्येकाच्या अंतःकरणाला हुरहुर लावणारी वाटते. त्यांनी समाजासाठी झिजण्याचा दिलेला संदेश तरुणांनी आत्मसात केला, तरच एकसंघ समाज उभा राहू शकतो.यावेळी प्रा. देशमुख यांनी तत्त्वहीन राजकारण, चारित्र्यशून्य शिक्षण, विज्ञानाची मानव निरपेक्षतता, त्यागाशिवाय उपासना, परिश्रमाशिवाय संपन्नता, सचोटीशून्य व्यवहार व निष्ठेचा अभाव ही सात पापे माणूस करीत असल्याने स्वातंत्र्यवीरांचे स्वप्न भंगले असल्याचे सांगितले.आज जातीवर राजकारण चालते हे दुर्दैवी आहे. आदर्श समाज उभा करायचा असेल, तर छत्रपती शिवाजी महाराज, शाहूमहाराज, महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या चार धामांच्या विचारांची गरज असल्याचे सांगितले.

प्रास्ताविक अविनाश आदिक यांनी केले. परिचय प्रा. बी. आर. आदिक यांनी, तर आभार नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी मानले. यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्या मीनाताई जगधने, पुष्पाताई आदिक, अविनाश आपटे, अप्पासाहेब कदम, अ‍ॅड. वसंतराव मनकर, लहुजी कानडे, संपत नेमाणे आदींसह मोठा जनसमुदाय उपस्थित होता.