Thu, Jul 18, 2019 08:10होमपेज › Ahamadnagar › सर्वांनी निसर्ग संवर्धनाचा विचार करावा

सर्वांनी निसर्ग संवर्धनाचा विचार करावा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

श्रीरामपूर : प्रतिनिधी

प्रत्येकानेच निसर्ग संवर्धनाचा विचार केला, तरच भारत स्वच्छ आणि सुंदर होईल. अन्यथा कचर्‍याचे साम्राज्य असलेल्या भारताला  प्रगत म्हणताच येणार नाही, असे मत भाभा ऍटोमिक सेंटरचे प्रमुख शास्त्रज्ञ  पद्मश्री डॉ. शरद काळे यांनी व्यक्त करताना आज शेतीच्या कामाबाबत  अनास्था निर्माण होत असल्याबद्दल खंत व्यक्त करीत मंदिराच्या रांगेत उभे राहून वेळ घालविल्याने कोणतेच प्रश्‍न सुटू शकणार नाहीत, असे सडेतोड विचार मांडले

प्रवरा पब्लिक येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे नियंत्रक विजय कोते, ज्येष्ठ संचालक के.पी.नाना आहेर, ज्ञानदेवराव म्हस्के, बाळासाहेब आहेर, शास्रज्ञ संभाजी नालकर, सुनील बोरुडे, प्रा. धनंजय आहेर, संदीप खर्डे, एम. बी. पडाळकर, प्राचार्या  लीलावती सरोदे, संगीता देवकर, स्वाती लोखंडे, विजय पाटील, अ‍ॅड. नितीन विखे  आदी उपस्थित होते. 

काळे म्हणाले की, आज शिक्षक, शास्रज्ञ आणि शेतकरी होऊन काम करण्याची कुणाचीच तयारी नाही. या तीन प्रमुख क्षेत्रांत काम झाले नाही तर, देशातील 80 टक्के जनता खाणार काय? असा प्रश्‍न उपस्थित करून बाकी केवळ इतरांनी केलेले प्रॉडक्ट वापरणारेच उरणार असल्याने बुद्धीला चालना देणार्‍या या क्षेत्रात तरुणांनी येण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. 

अगदी स्वयंपाकघरात सुद्धा शास्र असते, हे आपण आईकडून शिकल्याचे सांगून काळे यांनी प्रयोग शाळेत तयार केलेल्या वसुंधरा प्रकल्पाची माहिती सांगताना जगण्यासाठी गरजेच्या ऑक्सिजनची निर्मिती आपण एक झाड लावून करू शकतो, असे सांगितले. 

प्लॅस्टिक आणि डिस्पोजल वस्तू न वापरण्याचे आवाहन करताना घरातील कचर्‍यापासून सेंदीय खत निर्माण केले, तर रासायनिक खतांचा एक दाणाही वापरण्याची देशाला गरज तर पडणार नाहीच. परंतु एका दिवसात भारत स्वच्छ होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी विजय कोते यांनीही मार्गदर्शन केले. राज्याच्या विविध जिल्ह्यांतील पालक कार्यक्रमास उपस्थित होते. उपप्राचार्य एस. व्ही. गोडगे यांनी उपास्थितांचे आभार व्यक्त केले. या वेळी विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन सादर केले.