Tue, Apr 23, 2019 07:44होमपेज › Ahamadnagar › बोंडअळीला शासनाच्या नियमावलीची कीड

बोंडअळीला शासनाच्या नियमावलीची कीड

Published On: Dec 30 2017 12:33AM | Last Updated: Dec 29 2017 10:24PM

बुकमार्क करा
 श्रीरामपूर : गोरक्षनाथ शेजुळ

अगोदरच नैसर्गिक संकटामुळे मेटाकुटीस आलेल्या बळीराजाला बोंडअळीच्या अनुदानापासूनही जाचक अटी व नियम लादून सरकारने वंचित ठेवल्याने जिल्हाभरातून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, जिल्ह्यात 1 लाख 170 हेक्टर बोंडअळीने बाधित असून, त्यापैकी 697 गावातील सुमारे 36 हजार 185 हेक्टरवरील पिकांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. 

जिल्ह्यात यंदा सुमारे 1 लाख 25 हजार हेक्टर क्षेत्रावर शेतकर्‍यांनी कपाशी लागवडी केल्या होत्या. मात्र, अनिश्‍चित पर्जन्यामुळे कपाशीची सुरुवातीपासूनच हेळसांड सुरू होती. मात्र, शेतकर्‍यांनी मोठ्या कष्टाने कपाशीचे पिक चांगल्याप्रकारे जगवले होते. अगदी कपाशी काढणीवेळीच बोंडअळीने पिकावर आक्रमण केल्याने शेतकर्‍यांचे तोंडचे पाणी पळाले. कपाशी काढणीसाठी वाढलेली मजुरी आणि बाजारपेठेत मिळणार्‍या तुटपुंजा भाव यामुळे वैतागलेल्या शेतकर्‍याला बोळअंडीने पुरते हतबल केले. अशाप्रकारे जिल्ह्यात सुमारे 1 लाख 170 हेक्टर क्षेत्र बोंडअळीने बाधित झाल्याचा अंदाज आहे. याबाबत अनेक शेतकर्‍यांनी कृषी विभागाचे लक्ष वेधून मदतीची मागणी केली. मात्र, सरकारने याकडे फारसे गांभीर्याने पाहिले नाही. त्यामुळे शेतकर्‍यांनी बोंडअळीने हातातून गेलेल्या कपाशीवर रोटा चालवत रब्बीची तयारी केली. मात्र कर्जमाफीचे भिजत घोंगडे कायम असल्याने पुन्हा एकदा उसनवारी, सावकाराचे उंबरठे झिजवत रब्बीच्या पेरण्या केल्या. मात्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधार्‍यांनीच बोंडअळीने ग्रस्त झालेल्या शेतकर्‍यांच्या व्यथा सरकारसमोर मांडून मदतीची मागणी केली. त्यानंतरच सरकारलाही उशिरा शहानपण सुचल्याने त्यांनी महसूल, कृषि विभागाला बोंडअळीबाधक क्षेत्राचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. मात्र त्यामध्येही मराठवाडा व विदर्भातील शेतकर्‍यांना जास्तीत जास्त लाभ देण्याचे धेय्य डोळ्यासमोर ठेवून पंचनामे करण्यासाठी जाचक अटी व नियम लादले. त्यानुसार ज्या शेतकर्‍यांचे कपाशीचे पिक शेतात उभे असेल, त्यांचेच पंचनामे करून त्यांना हेक्टरी 37,500 रुपयांची सरकारची मदत देण्याची तयारी दाखवली. अर्थात त्यासाठी विशिष्ट प्रकारचा ‘अ‍ॅप’ तयार करून त्याद्वारे अक्षांश व रेखांक्षचा आधार घेवून त्या क्षेत्राचे पंचनामे सुरू केले आहेत. मात्र जिल्ह्यातील बहुतांशी शेतकर्‍यांनी रब्बी हंगामासाठी कपाशी पिक काढून टाकल्याने त्यांना यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. तर याउलट मराठवाड्यातील तीन जिल्ह्यात 10 लाख 48 हजार 538 हेक्टरवर कपाशी लागवड होवून सर्वच क्षेत्र बाधित दाखवण्यात आले आहे. त्यामुळे बोंडअळी मदतीतही पश्‍चिम महाराष्ट्राला सापत्न वागणूक मिळत असल्याची संतप्त प्रतिक्रीया आहे.कालअखेर जिल्ह्यात सुमारे 679 गावांमध्ये 48 हजार 685 शेतकर्‍यांच्या 36 हजार 185 हेक्टरवरील पिकांचे पंचनामे झालेत. 31 डिसेंबरपर्यंत सर्व पंचनामे पूर्ण केले जाणार आहेत. मात्र, ज्या शेतकर्‍यांनी कपाशी काढून टाकली, त्यांनाही मदत मिळावी, यासाठी शेतकर्‍यांच्या भावना तीव्र होत आहेत.