Sun, Oct 20, 2019 11:23होमपेज › Ahamadnagar › ४ गाळे शेतकर्‍यांसाठी राखीव

४ गाळे शेतकर्‍यांसाठी राखीव

Published On: Dec 23 2017 2:02AM | Last Updated: Dec 22 2017 9:22PM

बुकमार्क करा

श्रीरामपूर : प्रतिनिधी

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लिलावासाठी उपलब्ध असणार्‍या गाळ्यांपैकी 75 टक्के गाळे शेतकर्‍यांना शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी उपलब्ध करून द्यावेत, या प्रमुख मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काल बाजार समितीमधील गाळ्यांचा लिलाव बंद पाडला. अखेर संचालक मंडळाने नमते घेत शेतकर्‍यांसाठी चार गाळे राखीव ठेवण्याचा, शेतीमाल साठविण्यासाठी गोदाम बांधण्याचा आणि शेतकर्‍यांना दहा रुपयांत जेवण, तसेच बाजार समितीचे पदाधिकारी अथवा त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर असणारे गाळे खाली करण्याचा निर्णय समितीने घेतल्यानंतर शेतकरी संघटनेने आंदोलन मागे घेतले.

शेतकरी संघटनेचे नेते जितेंद्र भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली कार्यकर्ते काल (शुक्रवार) सकाळीच बाजार समितीच्या आवारात जमा झाले. शेतकर्‍यांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला. सभापती सचिन गुजर यांच्यासह संचालकांनी प्रारंभी शेतकर्‍यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतकर्‍यांनी आक्रमक होत बाजार समितीमधील गाळ्यांचा लिलाव बंद पाडला. बाजार समिती आवारातील भाजीपाला, फळ विक्रीसाठी बांधलेले गाळे आडते, व्यापार्‍यांना देण्यास आमचा विरोध नाही. मात्र, बाहेरची दुकाने शेतीपूरक साधन सामग्रीचा व्यवसाय करण्यासाठी शेतकर्‍यांनाच द्यावी, अशी जोरदार मागणी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली. या दरम्यान चर्चेअंती वरील मागण्या संचालक मंडळाने मान्य केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 

यावेळी गोदामाअभावी शेतीमाल खरेदी केंद्र सुरू करता येत नसताना पदाधिकारी मात्र केवळ गाळे बांधण्याचा अट्टहास करतात. बेलापूर उपआवारातील गोदाम पाडून शॉपिंग सेंटर उभारण्याचा निर्णय देखील आंदोलनाच्या रेट्यामुळे संचालक मंडळाला रद्द करावा लागला. शेतीपूरक कामे सोडून अन्य व्यवसायासाठी दुकानांचा वापर होतो, ती खाली करावीत, अशी मागणीही संघटनेकडून करण्यात आली ती संचालक मंडळाने मान्य केली.

 शेतकर्‍यांना पडलेल्या दरात शेतमाल विकावा लागतो. त्यामुळे बाजार समितीत शीतगृह (कोल्ड स्टोअर) उभारणीचा निर्णय यावेळी घेण्यात आला. पुढील काळात त्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाणार असल्याचे बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आले. या कोल्ड स्टोअरमध्ये शेतकर्‍यांना त्यांचा माल साठवता येणार असल्याने त्याचा मोठा फायदा शेतकर्‍यांना होणार आहे.