Sun, Mar 24, 2019 23:47
    ब्रेकिंग    होमपेज › Ahamadnagar › ‘छिंदम’चे निवेदन स्वीकारण्यावरुन गदारोळ

शिवसेनेकडूनच सभागृहात महापौरांची कोंडी!

Published On: Aug 03 2018 1:33AM | Last Updated: Aug 02 2018 11:36PMनगर : प्रतिनिधी

अफाट पोलिस बंदोबस्तात महापालिकेच्या सभेला हजेरी लावत श्रीपाद छिंदमने महापौर सुरेखा कदम यांना दिलेले निवेदन स्वीकारण्यावरुन शिवसेनेचे नगरसेवक अनिल शिंदे यांनी महापौरांनाच जाब विचारत त्यांची कोंडी केली. आयते कोलीत मिळालेल्या विरोधकांनीही महापौरांना घेरण्याचा प्रयत्न केल्यानंतर सभागृहात चांगलाच गदारोळ झाला. ‘माझ्यावर आरोप करत आहात. तो सभागृहात आला तेव्हा एकही नगरसेवक विरोधासाठी का पुढे आला नाही? असा सवाल करत पीठासीन अधिकारी पदावरुन मला गैरवर्तन करता येत नाही’, अशा शब्दांत महापौर कदम यांनी जाब विचारणार्‍यांना फटकारले.

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्‍तव्य केल्याप्रकरणी वादाच्या भोवर्‍यात सापडलेल्या छिंदमला पोलिसांनी बंदोबस्तात मागच्या दाराने सभागृहात आणले. यावेळी सभागृह नेते गणेश कवडे यांनी शिवगर्जनेचे वाचन सुरु केले. छिंदमने सभेला रितसर हजेरी नोंदविल्यानंतर सभेतील इतिवृत्ताच्या मंजुरीला आक्षेप घेणारे निवेदन महापौर कदम यांच्याकडे सोपवून छिंदम निघून गेला. हा सर्व प्रकार सुरु असतांना घोषणाबाजी करणार्‍या नगरसेवकांनी छिंदम निघून गेल्यानंतर महापौरांनाच धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. शिवाजी महाराजांचा अपमान करणार्‍या छिंदमचे निवेदन का स्वीकारले? निवेदन त्याच्या तोंडावर का फेकले नाही? अशा शब्दांत अनिल शिंदे यांनी महापौर कदम यांना जाब विचारत ‘लक्ष्य’ केले.

शिवसेनेकडून महापौरांची कोंडी झाल्यानंतर विरोधी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनीही निवेदन स्वीकारण्याच्या मुद्द्यावरुन महापौरांना घेरण्याचा प्रयत्न केला. माजी महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक सुनील कोतकर, संजय घुले, संपत बारस्कर यांनी छिंदमचे निवेदन स्वीकारु नये, अशी मागणी करत गदारोळ केला. आक्रमक नगरसेवकांकडून आरोप सुरु झाल्यानंतर संतापलेल्या महापौरांनीही नगरसेवकांना कडक शब्दांत ठणकावले. छिंदम येवून गेल्यावर माझ्यावर आरोप करत आहात. त्याला विरोध करायला एकही नगरसेवक का पुढे आला नाही? तेव्हा तुम्ही का विरोध केला नाही? असा सवाल महापौरांनी केला. तुम्ही विरोध करत नाहीत, आणि महिला महापौर असतांना माझ्यावर आरोप करता, असे म्हणत महापौरांना अश्रू अनावर झाले. नगरसेवक अभय आगरकर यांनी या वादात मध्यस्थी करत पीठासीन अधिकार्‍यांना सदस्याकडून आलेला अर्ज, निवेदन स्वीकारावेच लागते, त्यांना गैरवर्तन करता येत नाही, असे स्पष्ट केले.

छिंदमने सभेला रितसर हजेरी लावल्याचे समजताच नगरसेवक संजय घुले यांनी ज्या रजिस्टरवर छिंदमची सही आहे, त्यावर आमची हजेरी नको, असे म्हणत आमची हजेरी रद्द करावी, अशी मागणी केली. तसेच छिंदमने शिवाजी महाराजांचा अपमान करुन पुन्हा सभागृहात येवून सभागृहाचा अपमान केल्यामुळे आम्ही या सभेत सहभागी होणार नाही, आम्ही सभात्याग करत आहोत, अशी भूमिका मांडली. नगरसेवक गणेश भोसले यांनी या भूमिकेचे समर्थन करत सभात्याग करत असल्याची घोषणा केली. सदस्य सभागृह सोडत असतांनाच महापौर कदम यांनी शुक्रवारपर्यंत सभा तहकूब करत असल्याची घोषणा केली. दुसरीकडे सभागृहात गदारोळ सुरु असतांना भाजपाच्या गांधी गटाच्या सदस्यांनी मात्र या सर्व प्रकरणावर मौन बाळगणेच पसंत केले.

दरम्यान, सभागृहात अनिल शिंदे यांनी महापौरांची कोंडी करण्याचा प्रयत्न केल्यामुळे शिवसेनेच्याच नगरसेवकांनी नाराजी व्यक्‍त केली. याबाबत अनिल शिंदे यांना विचारले असता, महापौरांनी निवेदन स्वीकारणे चुकीचेच आहे, माझ्या भूमिकेवर मी ठाम असल्याचे सांगितले. नगरसचिव कार्यालयाने छिंदमचे पत्र स्वीकारून ते रितसर दाखल करुन घेतले असल्याने ते पत्र स्वीकारल्याचे स्पष्ट करत सभागृहात मी केवळ माझ्या भावना मांडल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

राजीनामा आणण्याची वल्गना करणारे कुठे गेले?

महापालिकेत शिवसेनेने विशेष सभेचे आयोजन करुन छिंदमचे नगरसेवक पद रद्द करण्याचा ठराव केला. यावेळी भाजपच्या ज्या नगरसेवकांनी आठ दिवसांत त्याचे पद रद्द करुन आणू, जेलमध्ये जावून त्याचा राजीनामा घेवून येवू, अशा वल्गना केल्या, ते कुठे आहेत? सभेत गोंधळ सुरु असतांनाही भाजपच्या एका गटाचे नगरसेवक शांत बसले होते. एकानेही त्याला विरोधासाठी चकार शब्दही काढला नाही, अशा शब्दांत नगरसेवक सचिन जाधव यांनी भाजपाच्या गांधी गटावर टीकास्त्र सोडले.

सभागृह नेत्यांकडून ‘कोंडी’ची सारवासारव!

छिंदमच्या उपस्थितीमुळे सभागृहात सर्वच नगरसेवक आक्रमक झाले होते. निवेदन स्वीकारण्यावरुन गदारोळ झाला होता. त्यामुळे नगरसेवकांकडून महापौरांना जाब विचारला गेला. मात्र, शिवसेनेच्या नगरसेवकाने महापौरांची कोंडी केल्याचे निदर्शनास आणल्यावर आक्रमक भावनेतून आमच्या नगरसेवकाकडून चूक झाली असेल, अशा शब्दांत सभागृह नेते गणेश कवडे यांनी पत्रकारांशी बोलतांना सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

मला आरे-कारे करता येणार नाही!

छिंदम प्रकरणावरुन गदारोळ सुरु असतांनाच सदस्यांनी त्याच्या उपस्थितीबाबत नगरसचिवांना स्पष्टीकरण मागितले. नगरसचिव एस.बी.तडवी यांनी छिंदमचा आदरपूर्वक उल्लेख केल्यामुळे नगरसेवकांनी त्यांना धारेवर धरले. मात्र, महापालिकेच्या लेखी छिंदम हे नगरसेवक आहेत. सभेला उपस्थित रहाणे हा त्यांचा कायदेशीर अधिकार आहे. त्यामुळे मी त्यांना आरे-कारे कसे करु शकतो? असा सवाल करत ते आजही सभागृहाचे सदस्य असल्याचे स्पष्टीकरण तडवी यांनी दिले.