Thu, Apr 25, 2019 11:34होमपेज › Ahamadnagar › सातारा : उंब्रज दरोडा प्रकरणात श्रीगोंद्‍यातील ४ ताब्यात 

सातारा : उंब्रज दरोडा प्रकरणात श्रीगोंद्‍यातील ४ ताब्यात 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

श्रीगोंदा : प्रतिनिधी

सातारा जिल्ह्यातील उंब्रज येथे २२ नोव्हेंबरच्या पहाटे दरोडा टाकणाऱ्या टोळीतील शशिकांत दप्तरया भोसले, अतुल दप्तरया भोसले रा. वडघुल ता. श्रीगोंदा, देवराम घोगरे रा. महाडुळवाड़ी, मांडवगण ता. श्रीगोंदा आणि दर्शन उर्फ अरुण दशरथ चव्हाण रा. पदमपुरवाडी ता. नगर या चार संशियत दरोडेखोरांना श्रीगोंदा पोलिस आणि सातारा पोलिस यांच्या संयुक्त पथकाने काल (दि.२६) रोजी रात्री उशिरा ताब्यात घेतले. यातील देवराम घोगरे हा वाहनचालक आहे.

याबाबत पोलिस सूत्राकड़ून मिळालेली माहिती अशी, २२ नोव्हेबरच्या पहाटे १ ते ३ च्या दरम्यान आठ ते नऊ दरोडेखोरांच्या टोळीने जैबुन मुल्ला यांच्या घरी दरोडा टाकत तर इतर पाच ठिकाणी घरफोड़या केल्या होत्या. दरोडेखोरांच्या मारहाणीत जैबुन मुल्ला या वृद्धा ठार झाल्या होत्या. गुह्याची पद्धत व काही तांत्रिक मुदयाच्या आधारे पोलिसांनी नगर जिल्ह्यात लक्ष केंद्रित केले होते. गुप्त खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीवरुन, पोलिस पथक २५ रोजी श्रीगोंदा तालुक्यात दाखल झाले. श्रीगोंदा पोलिसांच्या मदतीने संशयित आरोपीची माहिती काढून त्याबाबत खातरजमा करण्यात आली. 

सातारा आणि श्रीगोंदा पोलिसांचे संयुक्त पथक गेल्या दोन दिवसांपासून मांडवगण भागात तळ ठोकून होते. सुरूवातीला दरोडा टाकण्‍यासाठी ज्या वाहनाचा वापर करण्यात आला होता. त्या वाहनचालकास ताब्यात घेण्यात आले. २१ रोजी रात्रीच आरोपी समवेत उंब्रज या ठिकाणी गेल्याची कबूली त्याने पोलिसांना दिली. दरोड्‍यात जी इनोव्हा गाड़ी वापरण्यात आली ती गाड़ीही ताब्यात घेण्यात आली आहे. 
त्यानंतर शशिकांत दप्तरया भोसले व अतुल दप्तरया भोसले या दोघाना गुंडेगाव शिवारातून ताब्यात घेण्यात आले. चौथा आरोपी दर्शन उर्फ अरुण दशरथ चव्हाण याला पदमपुरवाड़ी येथून ताब्यात घेण्यात आले आहे.

या कारवाईत पोलिस उपाधीक्षक सुदर्शन मुंढे, पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार, पोलिस नाइक अंकुश ढवळे, किरण बोराडे, उत्तम राउत यांनी महत्त्‍वाची भूमिका बजावली.