Sun, Apr 21, 2019 06:32होमपेज › Ahamadnagar › बाजारपेठेतील दुकाने फोडली

बाजारपेठेतील दुकाने फोडली

Published On: Dec 09 2017 1:42AM | Last Updated: Dec 08 2017 10:57PM

बुकमार्क करा

शेवगाव ः प्रतिनिधी

शेवगाव शहरात भर बाजारपेठेत एकाच रात्री चार दुकाने फोडून 46 हजार रुपयाचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांना चोरट्यांनी ही सलामी दिली आहे. पूर्वीही बाजारपेठेत चोर्‍या होऊन त्याचा तपास लागला नसल्याने  पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे.

शहरात गुरुवार दि. 7 रोजी रात्री बाजारपेठेत असणार्‍या गोपीकिसन श्रीकिसन लोहिया यांचे किराणा दुकान, पंचायत समिती कार्यालया समोरील अशोक राठी यांचे साई आयुर्वेदालय, टेलिफोन कार्यालया समोर प्रशांत परदेशी यांचे प्रणव कम्युनिकेशन व पाथर्डी रोडलगत असणारे गोपाल खबाले यांचे श्रीराम कम्युनिकेशन या चार दुकानाचे शेटर उचकटून अज्ञात चोरटयांनी आतील मालाची उचकापाचक केली. एकूण 46 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल एकाच रात्री चोरून नेला आहे. तर अनिल काथवटे यांचे पवन ज्वेलर्स हे दुकान फोडण्याचा प्रयत्न केला आहे. हे व्यापारी नेहमीप्रमाणे सकाळी आपली दुकाने उघडण्यासाठी आले असता झालेला प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली.

याबाबत अज्ञात चोरट्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, काही दिवसांपूर्वी बाजारपेठेत काही दुकाने फोडली गेली होती. गत महिन्याच्या अखेरीस रविकिरण चंद्रकांत पंडीत या सराफाच्या घरातून 15 तोळे सोने चोरीस गेले होते. घर, बाजारपेठ, रुग्णालय येथून दुचाकी वाहन चोरीचे प्रकार वाढत आहेत. त्यात गुरुवारी पुन्हा चोरी सत्र झाल्याने व्यापारी भयभीत झाले आहे.