Mon, Nov 19, 2018 21:02



होमपेज › Ahamadnagar › ...तर शिवसैनिक स्वतः पोलिस स्टेशनला हजर होतील : एकनाथ शिंदे

'...तर शिवसैनिक पोलिस स्टेशनला हजर होतील'

Published On: Apr 16 2018 12:45PM | Last Updated: Apr 16 2018 1:23PM



नगर : प्रतिनिधी

केडगाव येथील शिवसैनिकांच्या हत्याकांडातील सर्व आरोपींना पोलिसांनी अटक करावी. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर दाखल केलेल्या गुन्ह्यातील चुकीची कलमे मागे घ्यावीत. शिवसैनिकांच्या भावनेचा तो उद्रेक होता. आधी हत्याकांडातील सर्व आरोपींना अटक करा, शिवसैनिक स्वतःहून पोलिस स्टेशनला हजर होतील, त्यांना पकडण्याची आवश्यकता नाही. कायदा-सुव्यवस्था राखणे ही पोलिसांची जबाबदारी आहे. वाढत्या गुन्हेगारीचा व दहशतीचा बंदोबस्त त्यांनी केला पाहिजे. आरोपींना फाशीची शिक्षा झाल्या शिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नसल्याचा इशारा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

केडगाव येथील शिवसेना उपशहर प्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची हत्या करण्यात आली होती. आज केडगावमधील अमरधाममध्ये त्यांच्या दशक्रिया विधीचा कार्यक्रम होता. याठिकाणी शिंदे व राज्यमंत्री दादा भुसे यांनी दोन्ही कुटुंबियांचे सांत्वन केले. त्यानंतर नगरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना उपनेते अनिल राठोड, निफाडचे आमदार अनिल कदम, कल्याणचे आमदार बालाजी किणीकर, शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे,  रावसाहेब खेवरे, संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, महापौर सुरेखा कदम, शहरप्रमुख दिलीप सातपुते, संभाजी कदम आदी उपस्थित होते.

ना. शिंदे म्हणाले की, केडगावात अमानुषपणे दोन कट्टर शिवसैनिकांची हत्या करण्यात आली. यावरून आरोपींना कायद्याची भीती, धाक नसल्याचे दिसून येत आहे. या गुन्हेगारांवर जरब बसली पाहिजे. जेणेकरून पुढे कुणावर असे प्रसंग येऊ नयेत. भाजप-राष्ट्रवादी व काँग्रेस यांनी संगनमताने हे हत्याकांड केले असून, यातील आमदारांचे घटनेपूर्वी व घटनेनंतरचे संभाषण पोलिसांनी तपासले पाहिजे. याची चौकशी होऊन पोलिसांनी सत्य बाहेर आणावे. सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पवार यांच्या आत्महत्येमागे हीच मंडळी असल्याचा आरोपही ना. शिंदे यांनी केला.