Thu, Jun 20, 2019 01:35होमपेज › Ahamadnagar › साईंच्या झोळीत साडेपाच कोटींचे दान!

साईंच्या झोळीत साडेपाच कोटींचे दान!

Published On: Dec 26 2017 9:09PM | Last Updated: Dec 26 2017 9:09PM

बुकमार्क करा

शिर्डी : प्रतिनिधी

सरत्या वर्षाच्या शेवटी नाताळाच्या पार्श्‍वभूमीवर चार दिवसांच्या सुट्टीत शिर्डीत साईबाबांच्या चरणी सुमारे पाच लाख भाविक नतमस्तक झाले. या चार दिवसांत सुमारे 5 कोटी 50 लाखांचे घसघशीत दान साईंच्या चरणी अर्पण झाल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

याप्रसंगी उपजिल्हाधिकारी मनोज घोडे, धनंजय निकम, उपकार्यकारी अधिकारी संदीप आहेर, समाधी शताब्दीचे मुख्य संरक्षण अधिकारी आनंद भोईटे, मुख्य लेखा शाखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, जनसंपर्क अधिकारी मोहन यादव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

रूबल अग्रवाल म्हणाल्या, नाताळ सणाच्या निमित्ताने गेल्या चार दिवसांत ग्रामस्थ, मुखदर्शन आणि दर्शन बारीने दर्शन घेणारे, अशा सुमारे पाच लाख भाविकांनी दर्शन घेतले. या दरम्यान दक्षिणा पेटीत 3 कोटी रुपयांपर्यंतचे दान आले आहे. तर संस्थानच्या देणगी पेटीच्या माध्यमातून 1 कोटी 8 लाख रुपयांचे दान भक्तांनी दिले आहे. तर डेबिट, क्रेडिट या माध्यमातून 38 लाख 4 हजार रुपयांचे तसेच ऑनलाईनद्वारे 10 लाख 80 हजारांचे दान आले आहे. त्याचप्रमाणे धनादेश व डी.डी.च्या माध्यमातून 23 लाख 58 हजार, मनीऑर्डरच्या माध्यमातून सुमारे 2 लाख 35 हजार रुपयांचे दान आले. तर 21 लाख 89 हजार रुपये किमतीचे 781 ग्रॅमचे सोने, तसेच 2 लाख 14 हजार रुपये किमतीची 7 किलो 672 ग्रॅम चांदी आली आहे. त्याचप्रमाणे 17 परकीय देशांचे चलन आले असून, या माध्यमातून 12 लाख 42 हजार रुपयांचे दान आले आहे. भक्तनिवास, पेड दर्शन, लाडू प्रसाद या माध्यमातून पैसा आला आहे.

दरम्यान, साईभक्ताचा मंदिर परिसरात दुर्दैवी मृत्यू झाला. याबाबत संस्थान प्रशासन शोक व्यक्त करीत असून, यापुढे भाविकांनी आपल्या नातेवाईकांची काळजी घ्यावी. प्रशासनही भाविकांची काळजी घेण्यात कोणतीही तडजोड करणार नाही. झालेल्या घटनेबाबत प्रशासनाने जबाबदारी घेत त्यांच्या नातेवाईकांना योग्य ते सहकार्य केले आहे. त्याबाबत नातेवाईकांची कोणतीही तक्रार नसल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. 

नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक भाविक साईचरणी माथा टेकविण्यासाठी येत असतात. त्यासाठी 31 डिसेंबर रोजी मंदिर रात्रभर उघडे ठेवण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र दर्शन व्यवस्था करण्यात येणार आहे. वाढती गर्दी लक्षात घेता ऐनवेळी अतिमहत्त्वाचे दर्शन पासही बंद करण्यात येतील, अशी माहितीही अग्रवाल यांनी दिली.