होमपेज › Ahamadnagar › शिर्डी-पंढरपूर रेल्वेस तीन महिने अवधी

शिर्डी-पंढरपूर रेल्वेस तीन महिने अवधी

Published On: Dec 19 2017 1:55AM | Last Updated: Dec 18 2017 11:15PM

बुकमार्क करा

कोपरगाव : प्रतिनिधी

वारकर्‍यांचे आराध्य दैवत असलेल्या पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाची सोय रेल्वे खात्याने कमी खर्चात केली होती. मात्र, भिगवण ते कुर्डूवाडी या रेल्वेमार्गाची दुरुस्ती व दुहेरीकरणाचे काम सध्या सुरू असल्याने शिर्डी ते पंढरपूर ही रेल्वेगाडी चालू होण्यास अजून तीन महिन्यांचा अवधी लागणार असल्याने पांडुरंगाच्या भक्‍तांना या रेल्वे प्रवासासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

आंतरराष्ट्रीय दर्जाचे तीर्थक्षेत्र असलेली साईबाबांची शिर्डी तत्कालिन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी रेल्वे नकाशावर आणली.तेव्हापासून शिर्डी ते पंढरपूर ही पॅसेंजर रेल्वेगाडी सुरू होती. मात्र, या रेल्वेमार्गाचे दुरुस्तीकरण चालू असल्याने ही सेवा काही काळ बंद करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील वारकरी मंडळींची एकादशी पंढरीची वारी चूकू लागली आहे.

मनमाड ते पुणतांबा या 60 किलोमीटर रेल्वेमार्गाचे दुहेरीकरणाच्या सर्वेक्षणाचे कामही सुरू असून ते भोपाळ येथील कंपनीने घेतले आहे.  हे काम निम्म्याने पूर्ण झाले आहे. दौंड ते मनमाड हा रेल्वेमार्ग एकेरी असून त्यावरून 24 तासांत 48 ते 50 रेल्वेगाड्या धावतात. त्यामुळे तो दुहेरी केल्यास यावरील लोड निम्म्याने कमी होणार आहे. त्याच्या सर्वेक्षणाचे काम अनेकवेळा हाती घेतले. तत्कालिन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी हा मार्ग दुहेरी करण्याबाबत कार्यवाही सुरू केली होती. मात्र, ते पायउतार झाल्याने त्याला संथगती आली आहे.    साईबाबा समाधीला शंभर वर्षे पूर्ण होत असल्याने ऑक्टोबर 2018 मध्ये हा शताब्दी सोहळा साजरा होत आहे. त्यासाठी जगभरातील साईभक्‍त शिर्डी येथे येणार असल्याने त्यांच्या सरबराईसाठी सर्वच कामांनी वेग घेतला आहे.  रेल्वेचे अभियंता झा यांनी 2015 मध्ये कान्हेगाव ते अंचलगाव रेल्वेमार्ग नव्याने बदलून टाकल्याने अजून 20 वर्षे त्यावरून चांगल्याप्रकारे रेल्वे वाहतूक होईल. त्याचप्रमाणे अंचलगाव ते अनकाई हा रेल्वे मार्गही अजून 6 वर्षे सुरळीत चालेल.  साईबाबा शिर्डी रेल्वेस्थानक या मार्गावर असल्याने मनमाड ते दौंड रेल्वेमार्ग दुहेरी झालाच पाहिजे, ही मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. 

रस्ते वाहतुकीपेक्षा रेल्वेमार्ग प्रवासाला अत्यंत सुलभ असल्याने बहुतांश प्रवासी त्याला प्रथम पसंती देतात. मात्र, वर्षांनुवर्षे त्याच्या समस्या या टांगणीलाच आहे. 
अहमदनगर जिल्हा साखर उत्पादनाचे माहेरघर असल्याने येथील साखर देश विदेशात रेल्वे वॅगनद्वारे निर्यात होत असते. सर्वांधिक माल वाहतूक या मार्गावर मिळत असूनही रेल्वेखाते त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. तेव्हा रेल्वे सुखसुविधा विस्तारीकरणात या दौंड-मनमाड मार्गाला सवार्ंधिक लक्ष दिले जावे, अशी सर्वांची अपेक्षा आहे.