Thu, Jun 27, 2019 15:44होमपेज › Ahamadnagar › मोफत दर्शन पासचा उडाला फज्जा

मोफत दर्शन पासचा उडाला फज्जा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

शिर्डी : प्रतिनिधी

रविवार असल्यामुळे शिर्डीमध्ये भाविकांनी गर्दी केली होती. अचानकपणे वाढलेल्या गर्दीमुळे साई संस्थांन प्रशासनाच्या मोफत नोंदणी दर्शन पास सेवेचा फज्जा उडाला होता. साईभक्तांचे हाल पाहून शिर्डीतील प्रमुख ग्रामस्थांनी हस्तक्षेप करीत संस्थानची ही योजना बंद पाडली. त्यामुळे शिर्डीत येणार्‍या भाविकांना सुखकर दर्शन होऊ शकले.

सध्या शहरात थंडीचा जोर कमी असल्याने व रविवारी प्रशासकीय सुट्टी असल्याने शनिवारपासूनच शिर्डीत साई दर्शनासाठी भाविक आले होते. त्यामुळे सहाजिकच रविवारी सकाळपासूनच गर्दी झाली होती. सध्याचे मोफत नोंदणी दर्शन पासचे काउंटर मंदिरापासून साधारण अर्ध्या किमी अंतरावर व्यवस्था करण्यात आल्यामुळे भाविकांनी त्या ठिकाणी जास्त गर्दी केली होती. मंदिर ते पास कांउटर दरम्यान भाविक अनवाणी पायाने जात होते. त्यामुळे मोठ्या कष्टप्रद मार्गातून दर्शनाचा पास मिळविण्यासाठी जावे लागत होते. 

नगरसेवक अभय शेळके यांच्या लक्षात ही बाब आली. त्यांनी तात्काळ भ्रमणध्वनीवरून प्रशासनातील प्रमुख अधिकार्‍यांशी संपर्क साधून भाविकांची पास काउंटरवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. गर्दीच्या तुलनेत फार कमी पास काउंटर आहेत. त्यामुळे ही गर्दी आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता आहे. तीन-तीन तास रांगेत उभे राहूनही हा पास उपलब्ध होत नाही. त्यामुळे भाविकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगितले. 

यासर्व घडामोडीनंतर प्रशासनातील काही अधिकार्‍यांनी तात्काळ मोफत दर्शन नोंदणी पास बंद करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय लवकरच झाल्यामुळे भाविकांना तात्काळ दर्शन बारीत उभे राहण्यास संधी मिळाली. साईबाबांचे सुखकर दर्शन मिळण्यास प्रमुख ग्रामस्थांमुळे शक्य झाले. 

यानंतर शिर्डीतील एका हॉटेल मध्ये काही प्रमुख ग्रामस्थांची बैठक झाली. या बैठकीत एका अधिकार्‍यांशी चर्चा करून या योजनेबाबत उद्या सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे. 

या बैठकीत उपकार्यकारी अधिकारी डॉ. संदीप आहेर, प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते, सुधाकर शिंदे, नगरसेवक अभय शेळके, नितीन कोते, प्रमोद गोंदकर, नगरसेवक दत्तात्रेय कोते, सुजित गोंदकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.