होमपेज › Ahamadnagar › तिहेरी तलाक विधेयकास सर्वपक्षीयांनी पाठिंबा द्यावा

तिहेरी तलाक विधेयकास सर्वपक्षीयांनी पाठिंबा द्यावा

Published On: Dec 26 2017 1:31AM | Last Updated: Dec 26 2017 1:31AM

बुकमार्क करा

शिर्डी : प्रतिनिधी 

तिहेरी तलाक विधेयकाबाबत अकबरूद्दीन ओवेसी महिलांच्या विरोधात जाऊन या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर राजकारण करत  आहेत. मुस्लिम महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वपक्षीयांनी या विधेयकास पाठिंबा द्यायला हवा, असे मत सिनेअभिनेत्री तथा समाजवादी पक्षाच्या माजी खासदार जया प्रदा यांनी शिर्डीत व्यक्त केले. 

साई दर्शनासाठी त्या काल शिर्डीत आल्या असता उपस्थित प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होत्या. साईबाबा संस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जनसंपर्क अधिकारी मोहन यादव उपस्थित होते.

जया प्रदा म्हणाल्या, तिहेरी तलाक विधेयकावरून ओवेसी विनाकारण महिलांना या प्रकरणात आणून, राजकारण करीत आहेत. कारण ते ‘आदत से मजबूर’ आहेत. राजकारण न करता महिलांचे काय प्रश्न आहेत, काय दुःख आहे, हे त्यांनी जाणून घेतले पाहिजे. ओवेसी जे बोलले त्याला कायदेशीर आधार नाही. संसदेमध्ये रितसर चर्चा होऊन मग कायदा होईल. अणुकरारासाठी देशातील सर्व पक्षांनी त्यावेळी पाठिंबा दिला होता. तसा पाठिंबा देऊन देशातील सर्व पक्षांनी एकत्र येत मुस्लिम महिलांना त्यांचा न्याय्य हक्क मिळवून दिला पाहिजे.

‘तिहेरी तलाक’बाबत आपण महिलांसोबत आहोत. नुसते तलाक सांगून नाते तोडले जात असतील तर तो न्याय नाही, अन्याय आहे. या विधेयकांना आपले पूर्णपणे समर्थन आहे. संसदेत हे विधेयक मंजूर झाल्यास ते महिलांवरील अन्याय निवारणासाठी निश्‍चितच चांगले असणार आहे.  

गुजरातमध्ये तेथील जनतेने पुन्हा भाजपला यश मिळवून दिले आहे. त्यामुळे आगामी पाच वर्षांत शेतकर्‍यांचे दुःख ते दूर करतील.शेतकर्‍यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठे योगदान देत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास होत असल्याचेही जयाप्रदा यांनी यावेळी सांगितले.