Mon, Jun 17, 2019 04:35होमपेज › Ahamadnagar › केरळातील ५ हजार साईभक्तांना निवारा

केरळातील ५ हजार साईभक्तांना निवारा

Published On: Aug 20 2018 1:35AM | Last Updated: Aug 20 2018 12:56AMशिर्डी : प्रतिनिधी

केरळमधील पूराची परिस्थिती आणि विस्कळीत झालेल्या दळणवळण सेवेच्या पार्श्‍वभूमीवर देशभरातून केरळकडे मदतीचा ओघ सुरू आहे. शिर्डीच्या साई संस्थाननेही त्यात आपले योगदान देत शिर्डीत आलेल्या केरळच्या सुमारे 5 हजार साईभक्तांसाठी मोफत निवासाची आणि भोजनाची व्यवस्था करून मदतीचा हात दिला असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी दिली.

शिर्डी येथे साईशताब्दी वर्षानिमित्त साईचरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. या सोहळ्यात देशभरातील साईभक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आहे. याशिवाय परराज्यातून साईदर्शनासाठी येणार्‍या भाविकांची संख्याही लक्षणीय आहे. यामध्ये केरळ राज्यातील भाविकांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.

केरळमध्ये सध्या पावसामुळे हाहाकार उडाला असून, पुरात शेकडो नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत. केरळमध्ये पुरामुळे परिस्थिती चिंताजनक बनलेली आहे. रस्ते, विमान वाहतूक सेवा देखील विस्कळीत झालेली आहे. त्यामुळे शिर्डीत आलेल्या केरळच्या सुमारे 5 हजार भाविकांना घरी परतण्याची चिंता लागली आहे. अशा परिस्थितीत केरळच्या या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी साई संस्थानने त्यांना मदतीचा हात दिला आहे. 

केरळमधील स्थिती सामान्य होईपर्यंत तसेच वाहतूक सुरळीत होईपर्यंत, साई संस्थानच्या वतीने केरळमधील या साईभक्तांच्या निवासाची आणि जेवणाची मोफत व्यवस्था करण्यात आली असल्याचे हावरे यांनी सांगितले.