Sun, Jul 21, 2019 05:38होमपेज › Ahamadnagar › शेवगावात कापूस आवक मंदावली

शेवगावात कापूस आवक मंदावली

Published On: Jan 16 2018 2:08AM | Last Updated: Jan 15 2018 10:23PM

बुकमार्क करा
शेवगावः प्रतिनिधी

 शेवगाव बाजारपठेत कापसाची आवक मंदावली असून, उत्पन्न नसल्याने शेतकर्‍यांनी दराची पर्वा न करता आहे त्या भावात कपाशीची विक्री केली आहे. फार थोड्या शेतकर्‍यांकडे हे पिक दराच्या अपेक्षेत घरात पडून असण्याची शक्यता आहे.

 गेल्या सहा वर्षाच्या तुलनेत गतवर्षी कपाशी पिकाची विक्रमी आवक झाली. यंदाही हिच परिस्थीती होईलअशी शेतकर्‍यांना आशा होती.त्यामुळे बियाणे खरेदीला झुबंड उडाली. पसंतीचे वाण खरेदीसाठी अगोदरच नोंदणी केली. पावसाळा ऋतूच्या सुरवातीला झालेल्या जेमतेम पावसावर काही शेतकर्‍यांनी लागवड केली तर काही शेतकरी दमदार पावसाच्या प्रतिक्षेत थांबले. ऑगस्ट महिन्याच्या दरम्यान असा पाऊस बरसल्यानंतर उशीराने राहिलेल्या क्षेत्रात कपाशी लावली गेली.

मात्र, पुढे पाऊस आखडत राहिला तर कधी संततधार होत गेल्याने कपाशी पिक धोक्यात येत गेले. याने उत्पन्नाआधीच काही कपाशी पिकात नांगर फिरला. राहिलेल्या पिकाला जेमतेम पाते लागले. त्यात अर्धे गळाले, त्यानंतर उत्पन्न सुरू झाले. पहिली वेचणी जोमदार झाली आणि लगेच बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे किडक्या कापसाचे उत्पन्न हाती आले. सुरुवातीला 5 हजार ते 5 हजार 200 रुपये क्विंटल भाव होता, मात्र रोगाच्या कापसाचा भाव हजार रुपयाने खाली आला. त्यात पुढे घेण्यात येणार्‍या उत्पन्नावर हा रोग पसरु नये म्हणून आणि हाती उत्पन्न येणार नाही हे गृहीत धरूर कपाशी पिक मोडण्यात आले.

निसर्ग वातावरण बदलामुळे वर्षानुवर्ष कपाशी आवक कमी जास्त होत गेली. गतवर्षी याचा उच्चांक झाला तर 2013-14 व 2015-16 आणि यंदा याचा निच्चांक झाला. 2017-18 यंदाच्या वर्षी आत्तापर्यंत ही आवक 2 लाख 12 हजार 946 क्विंटल झाली. त्याची 85 कोटी 17 लाख 84 हजार सरासरी किंमत आहे. भावाची पर्वा न करता शेतकर्‍यांनी कपाशीची विक्री केली. आता बाजारातील आवक मंदावली असून भाव वाढतील या अपेक्षेवर साधारण 10 ते 15 टक्के कापूस शेतकर्‍यांच्या घरात असण्याची शक्यता आहे. शेतकर्‍यांना उत्पन्न आणि खर्च असा मोठा फटका बसला असल्याने बुडत्याला काडीचा आधार म्हणून बाधीत पिकाला मदत कधी मिळणार याच चर्चा झडत आहेत.