Sun, Jul 05, 2020 03:48होमपेज › Ahamadnagar › निरीक्षकांकडून नगरसेवकास शिवीगाळ

निरीक्षकांकडून नगरसेवकास शिवीगाळ

Published On: Dec 18 2017 2:27AM | Last Updated: Dec 18 2017 12:46AM

बुकमार्क करा

शेवगाव : प्रतिनिधी

शेवगावचे नगरसेवक तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक आहुजा यांना पोलिस निरीक्षकांनी शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला असून या बाबत सदर अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करुन तात्काळ त्यांना निलंबित करण्याची मागणी भाजपा व विविध नागरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज सोमवारी शेवगाव शहर बंद ठेवण्यात येणार आहे.  दि. 16 रोजी सायंकाळी आहुजा हे शहरात चोर्‍या वाढलेल्या आहेत, या कारणास्तव नागरिकांच्या सुरक्षतेसाठी गस्त घालणार्‍या कार्यकर्त्यांची यादी पोलिस अधिकार्‍यांना देण्यासाठी पोलिस ठाण्यात गेले होते. त्यावेळी ठाण्याच्या आवारातच दोन व्यक्तींचे कडाक्याचे वाद चालू होते.

स्थानिक कार्यकर्ता या जबाबदारीने नगरसेवक आहुजा मध्यस्ती करुन वाद मिटविण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र या वेळी महिन्यापूर्वी रुजू झालेले पोलिस निरीक्षक गोविंद ओमासे यांना या प्रकाराचा राग येऊन त्यांनी आहुजा यांची गचांडी धरली आणि त्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. पोलिसांना बोलावून याच्यावर गुन्हा दाखल करा, तुरुंगात डांबा, अशी उद्धट भाषा वापरली. अशोक आहुजा गेल्या 30 वर्षांपासून भाजपात व राजकारणात सक्रिय आहेत. सध्या ते शेवगाव नगरपरिषदेचे विद्यमान नगरसेवक असून भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत. अशा लोकप्रतिनिधीस पोलिस निरीक्षकांनी उर्मट वागणूक देऊन अर्वाच्च भाषा वापरली व कायद्याचे उल्लंघन केले. त्यामुळे या अधिकार्‍यावर गुन्हा दाखल करून त्यास तात्काळ निलंबीत करावे, असे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री प्रा.

राम शिंदे, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, जिल्हा पोलिस प्रमुख यांना भाजपा तालुकाध्यक्ष बापुसाहेब पाटेकर, नगरसेवक कमलेश गांधी, विनोद मोहिते, गणेश कोरडे, शेतकरी संघटनेचे दत्तात्रय फुंदे, दिनेश लव्हाट, नवनाथ इसारवाडे, अमोल घोलप, संजय शिंदे, भिमराज सागडे, सुनिल रासणे, श्याम जाजू आदींनी दिले आहे. या प्रकाराच्या निषेधार्थ आज, सोमवारी शहर बंद ठेवण्यात येणार आहे.
दरम्यान,  दि. 17 रोजी भाजपाचे 40 ते 50 कार्यकर्त्यांनी नगर येथे खा. दिलीप गांधी, आ. मोनिका राजळे यांची भेट घेतली. झालेला प्रकार कथन केला. त्यावर खा. गांधी यांनी मुख्यमंत्री, पालकमंत्री, प्रदेशाध्यक्ष यांना या प्रकाराची दूरध्वनीवरून माहिती दिली. संबधित अधिकार्‍यावर गुन्हा दाखल करुन निलंबन करण्याची मागणी केली. याबाबत त्वरीत कारवाई करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे खा. गांधी यांनी सांगितले.