Wed, Mar 27, 2019 06:40होमपेज › Ahamadnagar › वाकडीजवळ स्कूलबसला भीषण अपघात

वाकडीजवळ स्कूलबसला भीषण अपघात

Published On: Jul 01 2018 1:51AM | Last Updated: Jun 30 2018 10:52PMएकरुखे  : वार्ताहर

राहाता तालुक्यातील गणेशनगर येथे असलेल्या श्री स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी घेऊन जाणारी भरधाव वेगातील बस काल (दि.30) सकाळी चालकाचा ताबा सुटल्याने वाकडी शिवारात उलटली. या भीषण अपघातात शिक्षिकेसह 15 विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. 

दरम्यान, गेल्या वर्षीही या शाळेच्या स्कूलबसला अपघात होऊन विद्यार्थी जखमी झाले होते. मात्र, त्यानंतरही व्यवस्थापनाने जुन्याच बस वापरात आणल्याने कालचा अपघात घडला, अशी संतप्त प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केली.

काल सकाळी ही स्कूलबस (क्र.एमएच17-एजी7398) निर्मळ पिंप्री, अस्तगाव, चोळकेवाडी, वाकडी या मार्गावरील 50 विद्यार्थी घेऊन गणेशनगरच्या दिशेने भरधाव वेगात चालली होती.  वाकडी-गणेशनगर रस्त्याच्या खंडोबा फाट्याच्या पुढे देवीच्या मंदिराजवळ चालकाचा अचानक बसवरील ताबा सुटल्याने ती रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबाला धडकून पल्टी झाली.

 बसवर विद्युत तारा पडल्या होत्या. मात्र, सुदैवाने विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने बसमधील 50 विद्यार्थी बचावले.

अपघातानंतर विद्यार्थ्यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे रस्त्याने जाणार्‍या नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. यामध्ये बाळासाहेब लहारे, जि.प.सदस्य राजेंद्र लहारे, संदीप लहारे, कविता लहारे, शोभाताई घोरपडे आदींनी तत्परता दाखवत बसमधून शिक्षक आणि विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढले. मात्र, या अपघातात बसमधील शिक्षिका सुरेखा विठ्ठल लोंढे, प्रफुल्ल काळे, संस्कार शेळके, अर्थव चोळके हे चौघे गंभीर जखमी झाले. तर संचेत शेळके, प्रतीक्षा चोळके, वैभव लोंढे, आरूषी पठारे, रितेश चोळके, कृष्णा चोळके, कृष्णा येमके, गोकुळ चोळके, वाणी यासह 11 विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. चालक शंकर जाधव हा देखील जखमी झाला आहे. जखमींवर श्रीरामपूर शहरातील संतलुक हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत.

अपघाताची माहिती समजताच पालकांनी संतलुक हॉस्पिटलकडे धाव घेतली. तसेच गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, शिक्षण विस्तार अधिकारी वाकचौरे, पो.कॉ.मोरे, शिंदे आदींनी जखमींची विचारपूस केली. 

दरम्यान, या बसचे चार पाटे तुटलेले असून, एका पाट्यावर गाडी कशी काय वापरली जात होती? असा सवाल पालकांनी उपस्थित केला. गाडीच्या कंडीशनबाबतही त्यांनी यापूर्वी तक्रारी केल्या होत्या. एका विद्यार्थ्याकडून शाळा बससाठी साडेसहा हजार भाडे आकारते. असे असताना अशाप्रकारे लहान विद्यार्थ्यांच्या जीवाशी बेजबाबदारपणे खेळण्याचा शाळा व्यवस्थापनाचा हा प्रकार गंभीर असल्याचा आरोप पालकांनी केला आहे.