Fri, Apr 26, 2019 03:37होमपेज › Ahamadnagar › साडेतीन लाखांचे गोमांस पकडले

साडेतीन लाखांचे गोमांस पकडले

Published On: Dec 08 2017 1:35AM | Last Updated: Dec 07 2017 11:05PM

बुकमार्क करा

संगमनेर : प्रतिनिधी

संगमनेर शहरातील रहेमतनगर व भारतनगर परिसरात शहर  पोलिसांच्या पथकाने बेकायदा चालणार्‍या कत्तलखान्यावर टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी  3 लाख 40 हजार रुपये किंमतीचे 3 हजार 400 किलो गोमांस व 5 लाख 25 हजार रुपये किंमतीची चार चारचाकी वाहने असा एकूण 8 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी गोमांस घेऊन जाणार्‍या टेम्पोचालकास अटक केली आहे .

बुधवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास शहरानजीकच्या रहेमतनगर व भारतनगर परिसरातून मोठ्या प्रमाणात गोवंश मांसाची तस्करी होत असल्याची खबर पो.नि. औताडे यांना समजली. त्यानुसार त्यांनी स. पो. नि शंकरसिंह राजपूत, उपनिरीक्षक पंकज निकम यांच्यासह हवालदार ईस्माइल शेख, पो.ना. विजय पवार, गोरक्ष शेरकर, रमेश लबडे, सागर  धुमाळ, बाळासाहेब अहिरे यांच्या पथकाने संबंधित कत्तलखान्यावर छापा टाकला असता, पोलिसांना एका पटांगणात तीन वाहने उभी असल्याचे दिसून आले. पोलिसांनी वाहनांची तपासणी केली असता, टाट टर्बो क्र.एम.एच.48/ए.जी.6324, महिंद्रा मॅक्स क्र.एम.एच.23/6823 व विना क्रमांकाच्या टेम्पोत एकूण 2 हजार 500 किलो वजनाचे व तब्बल 2 लाख 50 हजार रुपये किंमतीचे गोवंशाचे  मांस भरल्याचे आढळले. पोलिसांनी हे सर्व मांस जप्त करून ताब्यात घेतले, तसेच 4 लाख 25 हजार रुपये किंमतीची तीन वाहने पोलिस ठाण्यात आणण्याची प्रक्रिया सुरू असतानाच याच कत्तलखाना चालकाच्या भारतनगरमधील कत्तलखान्यातूनही गोमांस भरले जात असल्याची माहिती पोलिसांना समजली. त्यानुसार पो.कॉ.प्रमोद गाडेकर, सुनील ढाकणे, साईनाथ वर्पे व पो.ना देशमुख यांनी पाठलाग करीत गौसिया मशिदीसमोर टेम्पो (क्रमांक एम.एच.17/ए.जी.540) अडवून त्याची तपासणी केली असता, त्यात सुमारे 900 किलो वजनाचे गोवंशाचे मांस आढळून आले.

या प्रकरणी पो.कॉ. विजय  पवार आणि प्रमोद गाडेकर यांनी शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून सलीम खवज्जा शेख, शाहीद हाफीज शेख, टेम्पोचालक अतिक रफिक कुरेशी यांच्यावर दोन स्वतंत्र गुन्हे. दाखल करण्यात आले. मात्र, हे दोघेही पसार होण्यात यशस्वी झाले आहे.  दरम्यान, जोपर्यंत शहरातील अवैध कत्तलखाने बंद होत नाही, तोपर्यंत अशा कारवाया सुरूच राहतील, अशी तंबी पो.नि. गोकुळ औताडे यांनी  दिली.