Fri, Jul 19, 2019 00:53होमपेज › Ahamadnagar › संगमनेरात कचर्‍यापासून खत निर्मिती  

संगमनेरात कचर्‍यापासून खत निर्मिती  

Published On: Aug 29 2018 1:30AM | Last Updated: Aug 29 2018 12:32AMसंगमनेर : प्रतिनिधी

शहरात गोळा होणार्‍या कचर्‍यापासून खतनिर्मिती करण्याच्या प्रक्रियेला संगमनेर नगरपालिकेच्या वतीने संगमनेर खुर्द येथील कचरा डेपोवर प्रारंभ झाला आहे. कचर्‍यापासून तयार झालेले खत शेतातील पिकांसाठी उपयुक्त ठरत असल्यामुळे या खताला दिवसेंदिवस शेतकर्‍याची मागणी वाढत आहे. त्या खतापासून मिळणार्‍या उत्पन्नामुळे आता पालिकेला नवीन उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध झाला आहे.

संगमनेर नगरपालिकेच्या वतीने संगमनेर खुर्द येथे शहरात साठणारा कचरा टाकण्यासाठी अनेक वर्षांपासून कचरा डेपो कार्यान्वित करण्यात आला आहे. मात्र, या कचरा डेपोवर ओला व सुका कचरा प्लास्टिक आणि जुने कपडे असा सर्व कचरा टाकला जात असल्यामुळे  परिसरात सर्वत्र दुर्गंधी सुटत होती. यामुळे परिसरातील नागरिकांसह नाशिक- पुणे मार्गावरील प्रवाशांना नाक दाबून प्रवास करावा लागत होता. तसेच या कचर्‍यामुळे परिसरातील विहिरीचे पाणीही दूषित झाले होते. त्यामुळे हा कचरा डेपो येथून हलवून दुसरीकडे न्यावा, असा तगादा परिसरातील नागरिकांनी पालिकेकडे लावला होता. पालिकेने दुसरी पर्यायी जागा कुरण येथे शोधली होती. मात्र, तेथील नागरिकांनीही या कचरा डेपोस प्रखर विरोध केला होता. त्यामुळे नाईलजास्तव हा कचरा डेपो संगमनेर खुर्द येथेच ठेवावा लागला. 

या कचरा डेपोमुळे आमचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी कचरा डेपो हटाव कृति-समितीच्या माध्यमातून पुणे येथील प्रदूषण महामंडळाकडे (लवादाकडे) तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पालिकेने या कचर्‍यापासून खतनिर्मिती करण्याचे धोरण आखले आणि त्याची प्रत्यक्ष अमंलबजावणी सुरू केली.

संगमनेर शहरासह उपनगरातून  दररोज  सुमारे  25 मेट्रिक टन कचरा गोळा केला जातो. त्यात 15 मेट्रिक टन सुका आणि 10 मेट्रिक टन ओला कचरा असे प्रमाण आहे. त्या कचर्‍यावर शासनाच्या आदेशानुसार  शास्त्रोक्त पद्धतीने बायोमायनिंग प्रक्रिया करण्याचे काम पालिकेच्या वतीने सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत कचरा डेपोवर अस्तित्त्वात असलेल्या 15 हजार क्यूबिक मीटर  कचर्‍यापैकी 5 हजार क्यूबिक मीटर कचर्‍यावर पालिकेच्या वतीने  बायोमायनिंगद्वारे प्रक्रिया करून त्या कचर्‍यातील प्लास्टिक व कपडे व इतर कचरा मशीनद्वारे बाजूला केला जात आहे आणि  बेलिंग मशीनद्वारे प्लास्टिक आणि कपड्याचे  वेगळे  गठ्ठे तयार करण्यात येत आहे. अनावशक कचरा बाजूला करून उरलेल्या कचर्‍याचे मशीनद्वारे खत तयार करण्याचे काम जोमाने सुरू आहे.
 या प्रकल्पाद्वारे आतापर्यंत 3 हजार क्यूबिक मीटर कचर्‍याद्वारे खत निर्मिती करण्यात आली आहे. तसेच ओल्या कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी पालिकेच्या वतीने  कंपोस्ट व व्हर्मी कंपोस्ट  खत  निर्मिती प्रकल्पही उभारण्यात आले आहेत   आणि तयार झालेले खत शेतकर्‍यांना विकण्यासाठी डेपोवरच खतविक्री केंद्र सुरू केले आहे.  शेतकर्‍यांनी पालिकेच्या आरोग्य विभागाचे अमजद पठाण व सुनील मंडलिक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर यांनी केले आहे.