Mon, Jul 06, 2020 12:39होमपेज › Ahamadnagar › संगमनेर ऊसदर आंदोलन; ६० जण ताब्यात

संगमनेर ऊसदर आंदोलन; ६० जण ताब्यात

Published On: Jan 23 2018 3:49PM | Last Updated: Jan 23 2018 4:06PMसंगमनेर : प्रतिनिधी 

उसाला पहिली उचल २५५० रुपये दर देण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटना व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्यावर काढलेला मोर्चा  पोलिस प्रशासनाने कारखाना प्रवेशद्वाराजवळ अडविला. त्यामुळे संतप्त झालेल्या आंदोलनकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. आंदोलनकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दशरथ सावंतांसह ५० ते ६० आंदोलकांना पोलिसांनी अटक केले आहे.

राज्यातील इतर कारखाने उसाला पहिली उचल २५५० रुपये देतात. अकोले कारखान्याने सुद्धा मागणी मान्य केली. परंतु संगमनेर साखर कारखान्याला अडचण काय? असा सवाल करून आंदोलनकर्त्यांनी हातात ऊस घेऊन छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या तसेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब  ठाकरे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन मोर्चास सुरुवात केली. दुपारी दीड वाजता हा शेतकऱ्यांचा मोर्चा घोषणाबाजी करत कारखाना प्रवेश द्वाराजवळ गेला असता पोलिस प्रशासनाने मोर्चा प्रवेशद्वारावरच अडविला.

आमच्या घामाचे दाम मिळाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही असा पवित्रा आंदोलन कर्त्यांनी घेतला आम्ही सनदशीर व शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार आहे. आम्हाला आत जाऊ द्या, अशी विनंती आंदोलकर्त्यांनी पोलिसांना केली. मात्र, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होइल म्हणून पोलिस निरीक्षक गोकुळ औताडे यांनी आंदोलकर्त्यांना प्रवेश द्वाराजवळच अडविले. 

यावेळी पोलिस प्रशासन व आंदोलकांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर पोलिस उपअधीक्षक अशोक थोरात यांनी आंदोलकांशी चर्चा करून विचार विनिमय करा आणि हे आंदोलन मागे घ्यावी, अशी विनंती केली.  मात्र, आंदोलनकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यामुळे अखेर आम्हाला तुम्ही अटक करा, नाहीतर उपोषण करण्यास परवानगी द्या, अशी मागणी केली. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दशरथ सावंत यांच्यासह साहेबराव नवले, शरद थोरात, जनार्दन आहेर यांच्यासह आंदोलनकर्त्यांना अटक करून पोलिस ठाण्यात नेले आहे.