Wed, May 22, 2019 06:17होमपेज › Ahamadnagar › उत्तर नगर जिल्ह्याचे मुख्यालय : संगमनेरच योग्य

उत्तर नगर जिल्ह्याचे मुख्यालय : संगमनेरच योग्य

Published On: Feb 09 2018 1:58AM | Last Updated: Feb 08 2018 10:30PMगौतम गायकवाड, संगमनेर शहर

अहमदनगर जिल्हा विभाजनाची चर्चा अनेेक वर्षानंतर पुन्हा ऐरणीवर आली आहे. जिल्हा विभाजन नागरिकांच्या सोयीसाठी अत्यंत गरजेचे आहे. मात्र, शासनाच्या दृष्टीने हा धोरणात्मक विषय असल्याने ही केवळ नेहमीप्रमाणे चर्चाच राहते की काय? असा सवालही उपस्थित केला जात आहे. 

उत्तर नगर जिल्ह्याच्या विभाजनाबाबत भौगोलिकदृष्ट्या व लोकांच्या सोयीच्या दृष्टीने संगमनेर, श्रीरामपूर की शिर्डी मुख्यालयाच्या वेगवेगळ्या चर्चा होवू लागल्या आहे. मात्र संगमनेर हेच उत्तर नगर जिल्ह्याचे मुख्यालय व्हावे, यासाठी जिल्हा कृती समिती स्थापन करून पुन्हा एकदा संगमनेरकर रस्त्यावर उतरले आहे. 1995 साली तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी अहमदनगर जिल्हा विभाजनाची आवश्यकता असून त्यासंदर्भात कार्यवाही करू असे सुतोवाच करुन जिल्हा विभाजनाच्या चर्चेला तोंड फोडले होते. तेव्हापासून ते आजपर्यंतही चर्चा चालू आहे आणि पुढेही चालू राहील. याच काळात संगमनेरकरांनी कम्युनिष्ठ नेते स्व. राजाराम महाले, स्व. जगदीश आसोपा व स्व. सहाणे मास्तर यांच्या नेतृत्वाखाली कृती समिती स्थापन करीत आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले. श्रीरामपूरकरांचीही तितक्याच तीव्रतेची मागणी राहिली. संगमनेरकरांनी रस्त्यावर येवून पुणे-नाशिक महामार्गावर मोठे आंदोलन केले. संगमनेरच जिल्हा का? याबाबत अभ्यासूपणे कृती समितीतील तत्कालीन नेत्यांनी पटवून दिले. हजारो सह्यांचे निवेदने शासनाला पाठविण्यात आले. परंतु शासन दरबारी हा निर्णय होवू शकला नाही. 

संगमनेर तालुक्याचे क्षेत्रफळ 1 लाख 68 हजार हेक्टर आहे. हे जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यापेक्षा सर्वाधिक मोठे आहे. संगमनेर शहर हे पुणे- नाशिक या महामार्गावर असल्याने दळणवळणाच्या दृष्टीने सोयीचे आहे. अलिकडच्या काळात नव्याने सर्वेक्षण होवून देशाच्या अर्थसंकल्पनात तरतूद करण्यात आलेला नाशिक-पुणे रेल्वेमार्ग हा संगमनेर परिसरातून जात आहे. याशिवाय नुकत्याच सुरू  झालेला  शिर्डी विमानतळ संगमनेरपासून अवघ्या 20 मिनिटाच्या अंतरावर आहे. देशाच्या संपूर्ण वाहतूक व्यवस्थेला जोडणारा संगमनेर तालुका हा जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यापेक्षा वरचढ आहे. व्यापारात सर्वात अग्रेसर तालुका म्हणून संगमनेरकडेच बघितले जाते. कोट्यवधी रुपयांची उलाढाल ही संगमनेरमधून होते. तर शासनाला देखील सर्वाधिक महसूल हा जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यापेक्षा मोठा आहे. दोन साखर कारखाने, संगमनेर दूध संघ, थोरात दूध उद्योग समूह, मालपाणी उद्योग समुह यासारखे इतर अनेक मोठे उद्योग येथे आहे. आ. बाळासाहेब थोरात राज्य मंत्रीमंडळात महसूलमंत्री असतांना त्यांच्या प्रयत्नातून येथे बांधलेल्या शासकीय इमारतीमध्ये जिल्ह्याचे प्रशासकीय कार्यालये निर्माण होवू शकतात. त्यासाठी शासनाला पुन्हा निधी उपलब्ध करण्याची गरजच भासणार नाही. अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील जनतेला संगमनेर हेच जिल्ह्याचे मुख्यालय सोयीचे ठरणार आहे. म्हणून या तालुक्याचे नेते माजीमंत्री मधुकरराव पिचड यांनी देखील मागणी केली आहे. 

संगमनेरातील सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांनी एकत्र येवून जिल्हा मागणीचे रणशिंग पुन्हा एकदा फुंकले आहे. त्याचे नेतृत्व आ. बाळासाहेब थोरात यांनी करावे, अशी मागणी त्यांच्याच विरोधकांनी त्यांच्या निवासस्थानी येवून त्यांच्याकडे धरली. मात्र अत्यंत अभ्यासूपणे त्यांनी सर्व उपस्थितांना निवेदन करतांना सांगितले की, हा धोरणात्मक निर्णय आहे. त्याची चर्चा अद्यापपर्यंत नाही. जिल्हा विभाजन करतांना येणार्‍या अडचणी व नव्याने महाराष्ट्रातील काही जिल्ह्याच्या विभाजनाचीही माहिती त्यांनी दिली. जिल्हा विभाजनासाठी येणारा खर्च व जनतेची सोय या बाबी  विचारात घेतल्या जातात. उत्तर नगर जिल्ह्याचे विभाजन झाल्यास सर्वार्थाने संगमनेरच योग्य आहे व पुरातन काळात संगमनेर हे परागणा म्हणून होते. जिल्ह्याचा महसूल हा संगमनेरला जमा होत होता. याचे ऐतिहासिक दाखलेही त्यांनी दिले.  संगमनेरच्या अस्मितेसाठी आपण सर्व एकत्र आला आहात याबाबत त्यांनी सर्वांचे स्वागत केले. त्यांनी केलेल्या सूचक विधानावरुन जिल्हा विभाजनाची चर्चा ही चर्चाच राहते की काय? हीही शंका येवू लागली आहे.

शिक्षण क्षेत्रात संगमनेरची आघाडी मोठी आहे. आरोग्य सुविधेच्या बाबतीत संगमनेरचे ग्रामीण रुग्णालयाची घुलेवाडी येथे असलेली इमारत जिल्हा रुग्णालयाच्या दर्जाची आहे. संगमनेरच न्यायालयाची नविन इमारत सुसज्ज आहे. शिवाय येथील प्रशासकीय भवन सध्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला लाजवेल असे आहे. तर तहसील कार्यालयाची इमारतही त्याहूनही देखणी व भव्य आहे. नुकत्याच काही दिवसापूर्वी संगमनेरला स्वच्छ सर्वेक्षण अभियानात देशात आठवा नंबर मिळाला. हजारो वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. या सर्व बाबतीत जिल्ह्यातील इतर कोणत्याही तालुक्यापेक्षा संगमनेर तालुका उजवा आहे. आदिवासी व साकूर परिसरातील दुर्गम भागातील जनतेला तसेच  श्रीरामपूर, शिर्डी, राहाता, कोपरगाव या तालुक्यांनाही सोयीचे संगमनेर हे जिल्ह्याचे मुख्यालय राहील. सर्व पातळीवर संगमनेर हे  जिल्हा केंद्रासाठी योग्य आहे.  संगमनेरकरांची ही मागणी रास्त आहे. भौगोलिक, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक  अशा सर्व निकषावर संगमनेर हे इतर तालुक्यांच्या तुलनेपेक्षा वरचढ आहे. म्हणून जिल्ह्याचे मुख्यालय संगमनेर सर्वांच्या दृष्टीने योग्य आहे.